!!!! Vijayadashmi : विजयादशमी !!!!

 !!!!!! : पर्व विजयाचे,सृजन आनंदाचे ,दहन अमांगल्याचे !!!!!

विजयादशमी म्हणजे विराट विजय पर्व,निसर्गातील जे जे वाईट,सृष्टीतील जे जे अनिष्ट त्या त्या गोष्टींवर मिळवलेला अलौकिक विजय.शके १९४० विलंबी नामसंवत्सर,दक्षिणायन शरद ऋतु,विकार्मार्क संवत २०७४,अश्विन शुक्ल दशमी इसवीसन २०१८ गुरवार १८  ऑक्टोबर रोजी या वर्षीचा विजय पर्व अर्थात विजयादशमीचा सण साजरा करण्यात येईल.अश्विन शुक्ल दशमीला विशेष महत्त्व असल्यामुळे आणि दशमी तिथी अपराण्ह काळ आणि श्रवण नक्षत्र योग म्हणजे अलौकिक दसऱ्याचा सण होय.संपुर्ण भारत खंडामध्ये अत्यंत उल्हासाने,आनंदाने आणि पवित्र्याने साजरा करण्यात येणारा हा सण होय.भारताच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भागात या सणाची व्याप्ती असुन वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासुन सुरु झालेला नवरात्रउत्सव नवमीला हवनाने संपतो.विजयादशमीने नवरात्र उत्सवाची सांगता होते.दुर्गा पुजन करून देवीने महिषासुराचा केलेला वधाचा विजयउत्सव साजरा करण्यात येतो.धर्माचे राज्य प्रस्थापित करण्यात आल्याचे हे पर्व होय.उत्तर भारतात ह्या पर्वाला दसरा अथवा दशेहरा असे म्हणतात.दसरा हा सण म्हणजे रावण दहनाचा प्रतीक म्हणुन साजरा करण्यात येतो.दसरा म्हंटल कि रावण दहन आणि रामलीला या दोन गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.प्रभु रामचंद्राने रावणावर मिळवलेला विजयाप्रीत्यर्थ हा सण साजरा केला जातो.विजयादशमीचा अर्थ म्हणजे दशमी तिथीला मिळवलेला विजय अर्थात नकारात्मक किंवा दृष्ट शक्तींवर मिळवलेला विजय होय.

निसर्गचक्रातील वर्षाऋतुची समाप्ती म्हणुनही हा सण साजरा करण्यात येतो.अखंड बरसणाऱ्या वरुणराजाची कृपा पुढे असावी हा उदात्त हेतु आणि चातुर्मासातील स्थगित झालेले कार्य या दिवसा पासुन आरंभ करण्यात येते.हा मुहुर्त साडेतीन मुहूर्तांपैकी  एक मुहुर्त म्हणुन प्रसिद्ध आहे त्यामुळे या मुहुर्तावर केलेले कुठलेही कार्य शुभत्व आणि स्थिरत्व देतेच देते.अश्विन शुद्ध दशमी हि तिथी शुभ असुन या तिथीवर भुमी,वाहन,भवन,सुवर्ण ,रत्न ,रजत आदी बहुमोल खरेदी करण्याचे संकेत आहे.या दिवसाच वैशिष्टय म्हणजे दशमी तिथीचा संयोग,श्रवण नक्षत्र आणि दिवस संपण्याचा आणि रात्र सुरु होण्याचा अगोदरचा काळ,या काळाला विजय काळ म्हणटल्या जातो.

वंशपरंपरागत विजयादशमीला कुलोपचार नेवेद्य शस्त्रपुजा,अश्वपुजा,नवरात्रोत्थापन,पारणा,शमी पुजन,अपराजिता पुजन,सरस्वती पुजन  आणि सीमोलंघन्न हे सर्व महत्त्वाचे विधी ह्या दिवशी करण्याची प्रथा आहे.ह्या दिवशी घरा घरामध्ये पावित्र्याचे वातावरण असते.प्रभु रामचंद्राची पुजा करून झेंडुच्या फुलांच्या माळानीं संपुर्ण घर आणि प्रवेशद्वार सजविल्या जातो.विजयकाळामध्ये रावण दहनाला विशेष महत्त्व आहे.असा हा विजय पर्व काळ एक अनोखे चैतन्य घेऊन जेव्हा येतो रोम रोम उल्हासित होतो.

भारतीय परंपरेतील हा अनोखा सण कळत नकळत खुप काही शिकवुन जातो.याच्यातुन बोध घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वाईट काळ हा जास्तीत जास्त दिवस राहत नसतो.अंधकाराचे सीमोलंघन्न प्रकाश हा करोतच करतो.अंधारातुन प्रकाशाकडे,अज्ञानातुन ज्ञानाकडे,अंधश्रद्धेतुन श्रद्धेकडे,नैराश्याकडुन  चैतन्याकडे घेऊन जाणारा उत्सव होय.वाईटावर मिळवलेला विजय म्हणजे षडरिपुंचे दमन म्हणजे मोह,माया,लोभ मत्सर आदी विकारांवर मिळवलेला विजय,वाईट शक्ती फार काळ टिकत नसतात.असा हा विजय पर्व आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि निरामय आरोग्य तसेच मनशांती घेऊन हा विजय काळ यावा या सदिच्छा !!!!!!

!!!!!!!!!  शुभम भवतु  !!!!!!!!!