पितृ पक्ष : – श्रद्धा,श्राद्ध,श्रद्धांजली

!!!  आठवण पितरांची,ओळख संस्कृतीची  !!!

भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे नियोजित किंवा नियमित केलेला प्रत्येक सण, हा एक विशाल दृष्टीकोण ठेवुन , साजरा करावा हा प्रमुख हेतु. त्या त्या सणाला दिलेलं उत्सवाचे, महोत्सवाचे किंवा सोहळ्याचे भव्य दिव्य स्वरूप,प्रकटीकरण,साजरीकरण आणि सादरीकरण ,हे आणखि एक वैशिष्टय. याच शृंखलेतील असाच आगळा वेगळा सोहळा ,म्हणजे महालय किंवा श्राद्ध-पक्ष हा होय. यालाच पितृपक्ष किंवा पित्रपंधरवडा असे म्हणतात.

भाद्रपद कृष्ण प्रदिपदेपासुन तर भाद्रपद अमावस्ये पर्यंतचा काळ ,याला महालय काळ किंवा पितृ पक्ष, किंवा पित्रपंधरवडा असे म्हणतात. शके १९४०, विलंबी नामसंवत्सर,विक्रम संवत २०७४,भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ,इसवीसन ,२५ सप्टेंबर, २०१८, वार मंगळवार ,सकाळी ८.२२ मिनिटांनी महालय आरंभ होत आहे.या दिवशी प्रतिपदा श्राद्ध करता येईल .८ ऑक्टोबर २०१८ पर्यंत तिथीनुसार श्राद्ध कर्म करता येईल.आपल्या पुर्वसुरींनी या पितृपक्षाची उत्तम अशी मांडणी आणि महती करून ठेवली आहे.आपण आज जे आहोत,ते फक्त आणि फक्त पुर्वजांमुळे किवा पित्रांमुळे आहोत. आपले अस्तित्त्व, आज त्यांच्या मुळे आहे हे सत्य कसे नाकारता येईल.त्यामुळेच आपल्या पुर्वसुरींनी हा नियम घालुन दिला की, ह्या विशिष्ट कालखंडात, आपल्या ज्ञात किवा अज्ञात पितरांची आठवण,स्मरण आणि पुजन ,ह्यातुन एक आणखी एक पैलु अपोआप जोडल्या जातो,तो हा कि,ह्या निमित्ताने अन्नदानाचा हेतु साध्य होतो, आणि आप्तेष्ट,नातेवाईक, शेजारपाजार यांना सादर आमंत्रित करून सहवास, भोजन ,चर्चा आदी प्रक्रिया हि सहज घडुन येते.

पितृ पक्षाचे महत्त्व :

संपूर्ण विश्वा मध्ये ,अनेक पद्धतीनी मृत झालेल्या परिचित किंवा अपरिचित अशा व्यक्तींची स्मरण करण्याची म्हणून एक विशिष्ट पद्धती आहे.विविध धर्मांमध्ये व समाजामध्ये, हि आठवण करण्याची पद्धत वेगवेगळी असु शकतेआहे.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये मृत्त व्यक्तीचे श्राद्ध कर्म तसेच पितरांसाठी काही विहित कर्म करण्याची प्रथा पिढी दर पिढी चालत आली आहे.यासाठी पुर्वासुरींनी सुरेख असा कालखंड निवडला आहे.या कालखंडालाच पितृपक्ष अथवा महालय असे म्हणतात.भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासुन ते भाद्रपद कृष्ण अमावास्ये पर्यंत हे पर्व साजरे करण्यात येते.या कालखंडात दक्षिणायन सुरु झालेले असते.तसेच शरद ऋतुची चाहुल सुरु झालेली असते,पावसाळा जवळ जवळ संपलेला असतो,परतीचा पाऊस, आपला टप्पा गाठत असतो,शेतीची जवळपास सगळी काम होऊन गेलेली असतात. त्यामुळे बळीराजा काही निवांत क्षणाची अनुभूती घेत असतो.तसेच श्रावण महिन्यातील सणवार तसेच गौरी गणपतीचे आगमन होऊन गेल्यामुळे सणांची लगबग थांबलेली असते अश्या या धावपळीतुन काही काळ आपल्या वाडवडीलांच्या आठवणीत रमावे ,त्यांच्या ठायी कृतज्ञपणा दाखवावा, या हेतुने या पर्वाचे नियोजन करण्यात आलेले आहे. या पंधरवड्यात रोज श्राद्ध करावे असे सांगितले आहे.ह्या श्राद्धाद्वारे मृत्त व्यक्तीला अर्पण केलेली हि एक सुरेख श्रद्धांजली आहे.त्यामुळेच किंबहुना शास्त्रकाराणी याचे उत्तम नियोजन केले आहे.रोज शक्य न झाल्यास किमान पंचमी,षष्टी,अष्टमी,एकादशी,अमावस्या या तिथींना तरी महालय करावा,हेही कोणाला न जमल्यास भाद्रपद अमावस्येला हा महालय करावा म्हणुनच या अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे नाव दिले आहे.

ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुरूप आणि इच्छानुरूप हे श्राद्ध करता येते काही जणांच्या मनात मुळातच श्राद्ध का करावे? हा प्रश्न उभा राहू शकतो त्यामुळेच हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा व श्रद्धेचा आणि त्याही पेक्षा कृतज्ञतेचा प्रश्न निश्चित आहे कोणी याला श्राद्ध म्हणु शकते किवा श्रद्धांजली,भाव मात्र एकच आहे आणि का नसावा?कारण आपले अस्तित्त्वच मुळी पित्रांमुळे आहे.मृत व्यक्तींचे देहावसान झालेली तिथी माहित असेल तर त्या तिथीला ह्या पक्षात श्राद्ध करावे,तिथी माहित नसल्यास अमावास्येला करावे.सौभाग्यवती स्त्री मृत झाल्यास पितृ पक्षात नवमी तिथीस  श्राद्ध करावे यालाच अविधवा नवमी म्हणतात.ह्या काळात आपल्या पितरांना यथा योग्य संतुष्ट करण्याचे प्रयत्न केले जातात.त्यांच्या आवडीचे भोजन,आवडीचे वस्त्र,आवडीचे फळ-फुल प्रतीकात्मक स्वरुपात त्यांना अर्पण करण्यात येतात.या मागील धारणा अशी आहे  की अर्पण केलेले  पदार्थ आणि अर्पण करणाऱ्याचा भाव यामुळे पित्र किंवा मृतात्मे तृप्त होतात आणि मोक्ष पदास जाण्यास त्यांचा मार्ग प्रशस्त होतो, तसेच त्यांचे आशीर्वाद लाभतात त्यामुळे आपआपल्या ऐपतीप्रमाणे हे पर्व आपण साजरे करावे व आपल्या  पितरांचा आशीर्वाद प्राप्त करावा.

!!!!!!!!!!!!!!!!!शुभम भवतु !!!!!!!!!!!!!!!!!!