ऑक्टोबर महिन्याचे राशिभविष्य
ऑक्टोबर महिन्यामध्ये गतिशील ग्रह चक्रातील मोठा बदल होऊ घातला आहे.हा मोठा बदल म्हणजे गुरु या शुभ ग्रहाचा पालट अथवा राशांतर अनेक मंडळी या गुरु बदलाची वाट चातका सारखे पाहत असतात.ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन मराठी महिन्याचं वर्गीकरण करता येईल,भाद्रपद कृष्णपक्ष ९ ऑक्टोबर पर्यंत असुन १० ऑक्टोबर पासुन अश्विनशुक्ल पक्ष आरंभ होईल.ऑक्टोबर महिन्याची नांदी पितृ पक्षाने होत असुन,दिनांक १० ऑक्टोबर,अश्विन शुक्ल प्रतिपदा पासुन नवरात्र उत्सव आरंभ होत आहे.दिनांक ११ ऑक्टोबर रोजी गुरु हा ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल.१७ ऑक्टोबरला रवी तुळ राशीत भ्रमण करेल ,१८ ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा असुन १८ ऑक्टोबरला च शुक्र ग्रहाचा अस्त होत आहे. २३ ऑक्टोबरला येणारी अश्विनशुक्ल पौर्णिमा म्हणजे “कोजागिरी पौर्णिमा” साजरी करता येईल, २६ ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल.हे सगळे संदर्भ पाहता ऑक्टोबर महीना हा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असुन,अनेक ग्रहात्मक बदल अनुभवयास येतील.
मेष:
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल,तसेच ११ ऑक्टोबरला होणारा गुरुपालट हा मेष जातकांसाठी अष्टमात होणार असुन,सप्तमात रवी १७ ऑक्टोबरला येईल.चतुर्थामध्ये राहुचे भ्रमण, सप्तमात शुक्र, भाग्यात शनी, दशमात मंगळ-केतु चे भ्रमण हे सगळे ग्रहमान पाहता मेष जातकांसाठी ऑक्टोबर महीना हा बरचसा तणावपुर्ण आणि किंचतसा दिलासा देणारा राहील त्यामुळे ह्या महिन्यातुन फारस काही निष्पन्न होणार नाही याची मेष जातकांनी नोंद घ्यावी.
आरोग्य :महिन्याच्या मध्यापर्यंत षष्टातील रविचे भ्रमण आणि १८ तारखेपासुन प्रतिकुल होणारा गुरु म्हणजे गुरुचे अष्टमात भ्रमण.हे दोन योग पाहता मेष जातकांनी प्रकृतीबाबतीत काळजी घ्यावी.प्रकृतीच्या तक्रारी सुरूच राहतील उद्भवलेला आजारावर वेळीच चिकित्सा करून घेतल्यास उत्तम राहील.घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीकडे लक्ष पुरवावे लागेल.मन:शांतीसाठी विशेष प्रयत्न कारण अपेक्षित आहे.चालणे,फिरणे व्यायाम,प्राणायाम आदींची मदत घेतल्यास उत्साह व चैतन्य जाणवेल.
आर्थिक : या आघाडीवर हा महिना खर्चानी युक्त आणि आकस्मिक खर्चांना सामोरे जावे लागण्याचे संकेत देत आहेत.उद्भवलेल्या खर्चांमुळे आर्थिक नियोजन कोसळून पडल्याची शक्यता आहे.त्यामुळे आर्थिक नियोजनावर भर देणे अपेक्षित आहे.आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी.मोठी गुंतवणूक अथवा जोखीम टाळणे उत्तम राहील.
नौकरी-व्यवसाय : नौकरीव्यवसाया मध्ये हा महिना आव्हानांनी आणि अडचणींनी युक्त असा राहणार आहे.नौकरी मध्ये नियमित कामा बाबतीत काही बदलनां महिन्याच्या मध्यानंतर सामोरे जावे लागेल,तसेच वाढीव कामाचे दडपण आणि तणाव नियंत्रित करावे लागेल,वादाचे प्रसंग टाळणे हितावह राहील.मनाविरुद्ध घटना घडल्यामुळे अनुउत्साह जाणवेल,नौकरीमध्ये वाढलेल्या जबाबदाऱ्या पार पडताना त्रेधातिरपट उडणार आहे.वाढीव कामाची जबाबदारी अंगावर येऊन पडल्यामुळे वेळेचे गणित चुकलेले असेल,असलेली नौकरी टिकवुन ठेवण हितावह राहील.
व्यवसाया बाबतीत महिन्याचा पुर्वार्ध उत्तम राहील उत्तरार्ध मात्र प्रतिकुल ,आव्हानात्मक आणि अनपेक्षित घटनांनी युक्त राहील.व्यवसायाचे वेळापत्रक नियोजित करावे लागेल.पुढील काही काळासाठी असलेली प्रतिकुलता अगोदरच हेरून उपाय योजना केल्यास येणाऱ्या आर्थिक संकटातुन सहज मुक्त होता येईल.खर्चात कपात करून उत्पन्न वाढीवर भर देणे याशिवाय पर्याय राहणार नाही .अडकलेली देणी प्रलंबित राहतील व्यव्सायात्मक तणाव व्यापून राहील.
कोर्ट-कचेरी : या बाबतीत हा महिना फारच प्रतिकुल राहील त्यामुळे फारश्या अपेक्षा याबाबत ठेवुन चालणार नाही दीर्घकाळा पासुन चालु असलेले खटले तसेच राहतील,त्यातही तणाव निर्माण होईल वकील मंडळींचं आकस्मित घुमजाव,विस्मयचकित करणारे राहील.विरोधी पक्षाच्या डावपेचामुळे त्रस्त व्हायची वेळ येईल,श्रद्धा आणि सबुरी ह्याशिवाय पर्याय राहणार नाही.
नातेसंबंध : या बाबतीत संमिश्र फलदायी असा हा महिना राहील ऊन-पावसाचा खेळ अनुभवयास येईल,पुर्वार्धात मिळालेली शुभ फळे अचानकपणे उत्तरार्धात लोप पावतील,पुर्वार्धात नातेवाईकांच्या भेटी-गाठीला उधान येईल.चर्चा,विनिमय,सहवास सहभोजन यामुळे पुर्वार्ध तजेला देऊन जाईल हेच चित्र उत्तरार्धात मात्र पालटलेल असेल.उत्तरार्धात नातेसंबधात कटुतेचा अनुभव विस्मय निर्माण करणारा राहील.जोडीदाराशी काही विशिष्ट मुद्यावर मतभेद होतील.प्रसंगी हेच मतभेद तीव्रतेने टोकाच्या भुमिकेकडे वाटचाल करतील स्वत:ला वेळीच सावरा कुरबुरींकडे दुर्लक्ष करणे हितावह राहील.“क्रोध्ं समर्पयामि” हा मंत्राचा उपयोग केल्यास शांतता मार्गाने तह करता येईल.
विद्यार्थी : विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसोटी पाहणारा राहील,अभ्यासक्रमात बऱ्यापैकी रुळल्यावर आता परीक्षेला सामोरे जायची वेळ आलेली असेल. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी परिश्रमपुर्वक अभ्यासाला सामोरे जावेच लागेल.एकाग्र चित्त होण्यासाठी मन स्थिर करणे अपेक्षित राहील.महिन्याचा उत्तरार्ध मात्र प्रतिकुलतेकडे झुकल्यामुळे प्रचंड तणावाचे सावट निर्माण झाल्याचा आभास होईल,ह्या तणावाचे नियंत्रण करण्यासाठी मन:शांती,उत्साह,आत्मविश्वास आणि कठोर मेहनत ही आयुधे घेऊन लढावेच लागेल.पालकवर्गानी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे सजग होऊन लक्ष केंद्रित करावे.
वृषभ
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला पंचमातुन बुध षष्टात जाईल,१७ ऑक्टोबरला पंचमातुन षष्टात जाणारा रवी,तृतीय स्थानात असणारा राहु,षष्टात असलेला शुक्र ११ ऑक्टोबरला षष्टातुन सप्तमात जाणारा गुरु,अष्टम स्थानातले शनीचे भ्रमण,भाग्य स्थानात होणारे मंगळ-केतुचे भ्रमण ही ग्रहदशा पाहता वृषभ राशीसाठी ऑक्टोबर महिना काही सकारात्मकतेचे किरण घेऊन येणारा असेल.प्रतिकुल ग्रहस्थिती वर मात करण्यासाठी आणि अनुकुल ग्रहस्थितीचा लाभ घेण्यासाठी मनाचा समतोल ह्या महिन्यात साधावा लागेल.
आरोग्य : या महिन्याचा पुर्वार्ध चिंता करावयास लावणारा राहील.दुखण्यांची तीव्रता प्रकर्षाने अनुभवयास येईल प्रकृतीची हेळसांड करून चालणार नाही.उत्तरार्धात मात्र प्रकृती मध्ये लक्षणीय सुधारणा अनुभवयास येईल.घरातील ज्येष्ठ मंडळीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे लागेल.मानसिक ताणतणाव आणि चिंता यांचे योग्य नियोजन करणे क्रमप्राप्त राहील,आरोग्याच्या लहान-सहान तक्रारींकडे लक्ष देणे गरजेचे राहील, ग्रहांची प्रतिकुलता घालावण्यासाठी मनोबल जागृत करणे गरजेचे राहील.
आर्थिक : या बाबतीत महिन्याचे ग्रहमान प्रतिकुलतेकडे झुकल्यामुळे आर्थिक ताणतणावाला सामोरे जावे लागेल. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ आणि तंत्र बिघडल्यामुळे संपुर्ण महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडुन पडेल.आर्थिक चिंतेने मानसिक ताणतणाव तीव्र रूप धारण करेल.आर्थिक तणावामुळे गडबडुन गेल्यासारखे होईल,डगमगुन न जाता, न खचता, मन शांत ठेवुन निर्णय घ्यावे सर्वप्रथम आटोक्यात आणावे किंवा खर्चात प्रचंड कपात करावी.कर्ज प्रकरण,जामीन,स्थावर मालमत्तेचे व्यवहार आदी तत्सम व्यवहारामध्ये दगा फटका होऊ शकतो.महत्त्वाची खरेदी-विक्री पुढे ढकलावी.
नौकरी-व्यवसाय : नौकरीबाबती मध्ये महिनाभर संयम,शिस्त आणि शांती पुर्वक धोरण ठेवुन वाटचाल करावी लागेल,काही अनपेक्षित घडामोडी मना-विरुद्ध घडतील,त्यामुळे तात्पुरता हिरमोड होऊ शकतो आहे.त्यामुळे न डगमगता आहे त्या परिस्थितीला सामोरे जा.लहान-लहान गोष्टी रखडल्यामुळे मानसिक कुचंबना होईल,नौकरीमध्ये वावरताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की,मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनाच बाऊ न करता स्वतः ला कामामध्ये झोकुन द्यावे.नवीन नौकरीच्या शोधात असलेल्यांनी फारश्या आशा “सिर सलामत तो पगडी पचास” या उक्ती प्रमाणे नौकरी टिकवण्यास महत्त्व द्यावे.
ग्रहांची प्रतिकुलता व्यवसायासाठी दिलासादायक नक्कीच नाही त्यामुळे खालावलेली व्यावसायिक स्थिती या महिन्यात भीषण रूप धारण करू शकते.अनपेक्षितरित्या काही प्रश्नांना सामोरे जावे लागेल,देणीदारांचे दुखणे वाढेल,उत्पन्नाचा घसरलेला आलेख पाहत बसण्यापेक्षा कठोर उपाययोजना केल्याने परिवर्तन अपेक्षित राहील. “केल्याने होत आहे आधी केलेच पाहीजे” या उक्ती प्रमाणे वाटचाल केल्यास हि वेळ सुद्धा निघुन जाईल.जसे कि “उम्मीद पे दुनिया कायम हे |”
कोर्ट-कचेरी : या बाबतीत हाही महिना मागील पानाहुन पुढे असा राहील,त्यातही पुर्वार्ध हा नक्कीच दिलासादायक असणार नाही.उत्तरार्धात गुरु बळामुळे चित्र काहीस पालटेल,मात्र अष्टमातील शनी अजुनही न्यायालयीन प्रक्रियेत प्रतिकुलता टिकवुन ठेवणारा राहील,त्यामुळे ह्या महिन्याकडुन फारश्या अपेक्षा ठेवुन चालणार नाही स्थावर मालमत्तेचे वाद कोर्टा बाहेर मिटवल्यास बरे राहील.
नातेसंबंध : या बाबतीत हा महिना मानसिक ताणतणावांना आमंत्रण देणारा राहील,उद्भवलेल्या कौटुंबिक समस्यांना झुंज देतांना नातेसंबंध जपणे जास्त हितावह राहील.कौटुंबिक कलह आणि रोष जास्त वाढणार नाही, याची काळजी घ्यावी उद्भवलेले वाद त्याक्षणी मिटविल्यास पुढील होणारे दुष्परिणाम टाळता येतील.उत्तरार्ध मात्र छानसे वातावरण घेऊन येणारा राहील.वैवाहिक सौख्याचा अभाव भरून काढावा लागेल.
विद्यार्थी : या मंडळींची खरोखरच परिक्षा पहावयास लावणारा हा महिना राहील.अभ्यासक्रमाची झालेली सुरवात परीक्षेपर्यंत येऊन ठेपलेली असेल,त्यामुळे उडालेला गोंधळ आणि मेहनतीचा अभाव यामुळे कावरेबावरे झाल्यासारखे वाटेल हे मनावर बिंबवावे.पालक मंडळीनी सजग राहुन पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित करावे उत्तरार्धात गुरुचे बळ मिळाल्यामुळे संभ्रम दूर होईल.
मिथुन
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध पंचमात स्थित असुन ११ ऑक्टोबरला गुरु पंचमातुन षष्टात येणार आहे,१७ ऑक्टोबर रोजी रवी चतुर्थातुन पंचमात जाईल, धनस्थानामध्ये राहु चे भ्रमण, सप्तमात शनीचे भ्रमण अष्टमामध्ये मंगळ-केतु हे ग्रहमान पाहता,मिथुन राशीच्या जातकांसाठी ह्या महिन्याचा काळ कसोटी युक्त,संमिश्र फलदायी आणि आव्हानात्मक असा जाईल.
आरोग्य : याबाबतीत उत्तरार्ध आकस्मिक वळणे घेणारा राहील,आरोग्याच्या समस्या वाढल्यामुळे काही सुचेनासे होईल,अष्टमातील मंगळ-केतु युती दुखापतीसाठी आमंत्रण देणारी राहील.अग्नी,तीक्ष्णवस्तु आदी हाताळताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक राहील घरातील ज्येष्ठ मंडळीकडे लक्ष देणे गरजेचे राहील, क्वचित प्रसंगी शल्यक्रियेला हि सामोरे जावे लागेल.
आर्थिक : महिन्याची सुरवात याबाबतीत सकारात्मक झालेली दिसेल मात्र मृगजळासारखी ही स्थिती राहील,जसा-जसा महीना पुढे सरकेल तशी आर्थिकस्थितीची जाणीव ऑक्टोबर-हिट प्रमाणे जाणवायला लागेल.अनपेक्षित खर्च अनाहुतपणे समोर येऊन उभे राहतील,खर्चाचा बहुतांश भाग आरोग्याकडे वळवावा लागेल,तसेच डागडुजी आणि यांत्रिक खर्च गरजेचे असल्यामुळे करावेच लागतील.हे पुरेसे होत नाही तर काही अनाहुत पाहुणे येऊन उभे राहतील. सगळीकडुन परीक्षा घेणारा हा कालखंड राहील अशा स्थितीला सामोरे जातांना दोन गोष्टी स्वतःकडे असणे गरजेचे आहे एक तर स्वतःवरचा विश्वास आणि प्रचंड संयम.
नौकरी-व्यवसाय : नौकरीबाबती मध्ये राशी स्वामीची अनुकुलता मिळाल्यामुळे मागील महिन्यापासुन चांगली प्रगती साधता आल्यामुळे, पुर्वार्धात कामाच्या ठिकाणी प्रसन्नता आणि उत्साही वातावरण जाणवेल जसा जसा महीना पुढे जाईल हे उत्साही वातावरण मावळत जाईल.छान चालेल्या गोष्टी अचानक वेगळ वळण घेऊन बसतील,त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित कारण अवघड होऊन बसेल.असे जरी असले तरी कामावर लक्ष केंद्रित करणे आणि प्रयत्नांची पराकाष्टा वाढवणे हितावह असेल.
व्यवसाया बाबतीमध्ये दीर्घकालीन उपाययोजना आतापासुन केल्यास कालानुरूप पाऊले टाकल्यास योग्य राहील.व्यवसायात आलेली मरगळ जाणीवपुर्वक दुर करावी लागेल. कष्टाशिवाय तरणोपाय नाही,नवीन योजना तुर्तास पुढे ढकलाव्यात.
कोर्ट-कचेरी : दीर्घ काळापासुन चालले दावे-प्रतिदावे प्रतिकुलतेकडे वाटचाल करतील.फारसे आशादायी चित्र नसल्यामुळे हा महीन रेटावा लागेल.आपल्याच दाव्या-प्रतिदाव्यांचे पुनरावलोकन केल्यास योग्य राहील.स्थावर मालमत्तेचे विवाद समोपचाराने मिटवावे.घटस्फोट अथवा प्रापंचिक दाव्यांबाबत विरोधी वातावरण तीव्र होईल.
नातेसंबंध : नातेसबंध आणि पारिवारिक सौख्याच्या दृष्टीने महिन्याची सुरवात प्रसन्नपणे होईल.गाठी,भेटी,चर्चा,विनिमय आदी प्रसंगाची रेलचेल राहील.मात्र उत्तरार्धात नातेसबंध अनामिक तणावपुर्ण वळणावर उभे राहीतील काय खरे,काय खोटे असा संभ्रम राहील.संभ्रमामुळे मनावरचा ताबा सुटु शकेल त्यामुळे त्रागा निर्माण होईल आणि त्रागामुळे क्रोधचा पार वाढेल,असे होणे म्हणजे आनंदात दुख:चा वणवा पेटला जाईल.जोडीदाराच्या स्वभावाचे विविध छटांचे दर्शन या महिन्याच्या रंगमंचावर होईल.
विद्यार्थी : या वर्गांची अवस्था “अचपळ मन माझे न आवरे आवरीता” अशी राहील.सुरु झालेला अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची लगबग पाठ्यक्रमाचा तणाव यामुळे संभ्रमित व्हयला होईल.कापरासारखा वेळ उडुन गेल्यामुळे तोंडावर आलेल्या परीक्षेसाठी धावपळ उडेल,कठोर मेहनतीने हे चित्र पालटु शकते.पालक वर्गानी विद्यार्थ्यांना दिलास द्यावा आणि त्यांच्या तणावाचे व्यवस्थित नियोजन करावे.
कर्क
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध चतुर्थात भ्रमण करेल,तर ११ऑक्टोबरला गुरु चतुर्थातुन पंचमात येईल,१७ ऑक्टोबरला रवी तृतीयातुन चतुर्थात येईल, चतुर्थात असलेला शुक्र,राशीत असलेला राहु,षष्टात असलेला शनी,सप्तमात असलेला मंगळ-केतु हे ग्रहमान पाहता कर्क राशीसाठी हा महीना अतिशय महत्त्वाचा राहणार असुन गुरु चा पालट हि महत्त्वपुर्ण ग्रहगोलीय घटना राहणार आहे.कर्क राशीचे जातक ज्या गुरु पालटाची वाट पाहत आहे तो क्षण ११ ऑक्टोबरला येत आहे.हा गुरु सोबत हर्षउल्हास आणि चैतन्य घेऊन येत आहे.त्यामुळे पुढील जीवनातील वाटचाल करण्यासाठी आता प्रगतीच्या अश्वावर स्वार होण्यास हरकत नाही.
आरोग्य : गुरु बदलाची चाहुल एक नवीनच चैतन्य ओजस आणि उत्साह निर्माण करेल त्यामुळे आरोग्याची वाटचाल ठणठणीतपणाकडे सुरु होईल,खुप दिवसांपासुन असलेली चिंता आणि ताणतणाव आता निघुन जाण्याचे संकेत आहेत.त्यामुळे ताजेतवाने,हलके आणि अतिशय प्रसन्न असे वाटेल.कुटुंबामध्येही आरोग्याबाबतीत सजगता आणि सुधारणा राहील.जुनाट व्याधी व दुर्धर आजार असणाऱ्यांना उपचार पद्धती मध्ये नवीन मार्ग सापडेल.
आर्थिक : या बाबतीत आतापर्यंतचा संथ प्रवास आता वेग घेईल.अर्थकरणाबाबत सजगता आल्यामुळे आणि आर्थिक नियोजनावर भर दिल्यामुळे उत्पन्नाचा आकडा फुगलेला असेल अडकलेला पैसा नदीच्या प्रवाहा प्रमाणे मोकळा होईल हाती पैसा आल्याने हायसे वाटेल.ह्या ग्रहस्थितीच प्राधान्य कर्ज मुक्तीला पाहीजे.स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना थोडी दक्षता घ्यावी.ह्या उत्तम ग्रहस्थितीत उत्तम आर्थिक नियोजन केल्यामुळे पुढील आर्थिक वाटचाल सुलभ आणि फलदायी राहील.बचतीवर भर देण गरजेच आहे.
नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना उत्साहवर्धक तसेच आर्थिक लाभाचा राहील.कामाच्या ठिकाणी असलेला तणाव वरिष्ठ सहकार्य धोरण बदलुन जाईल.कर्तृत्त्वाची योग्य दखल घेतल्यामुळे आत्मविश्वास बळावेल अस जरी ग्रहमान असल तरी षष्टातली शनी कष्टाशिवाय तरणोपाय नाही हे सांगत आहे.नवीन संधी निर्माण होतील मात्र दक्षता पुर्वक चाचपणी करावी.
व्यवसायासाठी हा महिना अनुकुल असल्यामुळे दीर्घकाळा पासुन प्रलंबित योजना मार्गी लावता येतील,भांडवलाची योग्य ती जुळवणुक झाल्यामुळे नवे प्रकल्प हाती घेता येतील,विस्ताराचे धोरण प्रभावीपणे राबविण्याची संधी उपलब्ध होईल ह्या संधीचा पुरेपूर लाभ घेतल्यास व्यवसायामध्ये पाय भक्कम पणे रोवुन उभ राहता येईल.
कोर्ट-कचेरी : प्रचंड खोळंबलेले दावे आणि प्रकरण आता ऐरणीवर आलेली असेल.न्यालयीन निर्णय प्रक्रिया अनुकुल आणि सुलभ झाल्यामुळे प्रसन्न वाटेल.स्थावर मालमत्तेचे आणि तत्सम दावे निकाली निघतील वकील मंडळींचं सहकार्य लाभल्यामुळे आणि योग्य तो कायदेशीर सल्ला मिळाल्यामुळे मन निश्चिंत झालेल असेल.
नातेसंबंध : नातेवाईक,आप्तइष्ट आणि इतर मंडळी ह्यांची मनधरणी आणि विश्वास संपादन करण्याची हीच ती योग्य वेळ राहील.जुने आणि तत्कालीन वाद आणि गैरसमज यांना खड्या सारखे दुर करून साखर पेरणीयुक्त संवाद साधल्यास हवे ते इप्सित सहज साध्य करता येईल.भावंडाशी विशेष जुळवुन घ्यावे जोडीदाराशी समन्वयी धोरण ठेवल्यास सप्तमातील मंगळ केतु युतीचा फारसा त्रास होणार नाही.थोडक्यात नमत घेऊन काही गोष्टीबाबत जुळवुन घेतल्यास सौख्याची कमतरता भासणार नाही.
विद्यार्थी : दीर्घ काळापासुन बहुप्रतिक्षीत असलेला गुरु पंचमात आल्यामुळे विद्यार्थी वर्गानां प्रचंड दिलासा आणि उत्साह प्राप्त होईल.परीक्षेच्या तयारीसाठी आता वातावरण अनुकुल असेल ह्या ग्रह बदलाचा पुरेपुर लाभ घेतल्यास उत्तम यश प्राप्त करता येईल,तसेच भावी शैक्षणिक धोरणाचा प्रवास ही आखता येईल पालक मंडळींची चिंता आता दुर झालेली असेल.
सिंह
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध तृतीय स्थानात भ्रमण करेल,रवी १७ ऑक्टोबरला धनस्थानातुन तृतीय स्थानात जाईल,तर ११ ऑक्टोबरला गुरु चतुर्थात येईल,शनी पंचमात असुन मंगळ-केतु षष्ट स्थानात राहतील आणि राहु व्येय स्थानात राहील,शुक्र तुळ राशीत तृतीय स्थानात भ्रमण करेल,ही सगळी ग्रहस्थिती पाहता सिंह राशीसाठी हा महिना बऱ्याच अंशी अनुकुल राहील,गुरुची प्रतिकुलता सोडल्यास महिन्याकडुन घेण्यासारखं बरच काही राहील.
आरोग्य : या बाबतीमध्ये मात्र हा महिना कुरबुरींचा राहील,महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दुखणी वर काढतील तसेच काही जुनी व्याधी नव्याने त्रास देतील.पुर्वार्धातील मनस्थिती ताणावाकडे झुकल्यामुळे प्रचंड मानसिक अस्वस्थ जाणवेल महिना जसा पुढे सरकेल तशी-तशी ही अस्वस्थता कमी होत जाईल,ताणतणावाचे नियोजन तुमच्याच हातात राहील,त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे क्रमप्राप्त होईल,चालणे,फिरणे आदी व्यायाम प्रकार अवलंबिल्यास उत्तम आरोग्याचा लाभ प्राप्त होईल.
आर्थिक : आर्थिक समस्यांनी घेरलेला असा हा महिना राहील,थकित कर्ज आणि देणीदारांचा तणाव झेलताना मानसिक अस्वस्थता आणि तणाव राहील.उत्पन्नाचा आलेख खालवल्यामुळे नियोजित योजनांवर फुली मारावी लागेल,तसेच आर्थिक चणचणीमुळे नैराश्य आणि चीड-चीड होईल,चहु बाजुने आर्थिक कोंडी झाल्याने बाहेर पडण्याचा मार्ग स्वता:लाच शोधावा लागेल,यावरचा उत्तम उपाय म्हणजे खर्चावर नियंत्रण आणि कपात तसेच रात्रीचा दिवस करून कष्ट उपसावे लागतील.कर्ज घेणे आणि देणे टाळावे.
नौकरी व्यवसाय : नौकरीच्या ठिकाणी काम वाढलेल असेल,नवीन जबाबदाऱ्याची भर पडेल,स्वतः बरोबर इतरांची हि काम करावी लागतील.कामाचे दडपण न घेता आपल्या क्षमतेनुसारच काम करणे हितावह राहील.वरिष्ठांचा रोष आणि सहकार्यांचे असमन्वयी धोरण वाढल्यामुळे मेटाकुटीस आल्यासारखं वाटेल.थोडी धैर्याने वाटचाल करावी.
व्यवसाया बाबतीत महतप्रयासातुन रुळावर आलेली महत्त्वाची गाडी वेग घेतो न घेते तोच या महिन्यातील उत्तरार्धात नवीन वळणे घेत गाडीचा वेग मंदावेल.ठरवलेले नियोजित काम मार्गी न लागल्यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर पत प्रतिष्ठेची हानी होऊ शकते.हे सगळे टाळणे आपल्याच हाती राहील.व्यवसायिकांनी घाबरून न जाता न डगमगता संयमाने या परिस्थिती ला सामोरे जायचे आहे.
कोर्ट–कचेरी : न्यायालयीन प्रक्रिया मागील पानाहुन पुढे अशी राहील.या महिन्यात अपेक्षित असे काही घडणार नाही.मात्र काही खटले निकालापर्यंत आलेच तर दिलासादायक राहणार नाही.प्रसंगी आर्थिकहानीच करणारे राहतील,स्थावर मालमत्तेचे दावे शक्यतो पुढे ढकलावे.वकील मंडळींचा सल्ला शिरसावंद्य मानुन वाटचाल केल्यास योग्य राहील.
नातेसंबंध : नात्यांमधील कटुता उत्तरार्धानंतर कमी होताना दिसेल,त्याच बरोबर कौटुंबिक समस्या आणि प्रापंचिक कलह निर्णायक वळणावर येतील,समोपचार, समन्वय,सुसंवाद आणि सकारत्मकता हा दृष्टीकोण ठेवल्यास नात्यांच्या बाबतीत हा महिना दिलासा देईल,झालेले गैरसमज आणि वाद मिटवणे हितकारक राहील, जोडीदाराबरोबर काही तणावाचे प्रसंग येतील हा ताण-तणाव सुयोग्य पद्धतीने हाताळल्यास क्लेशदायक स्थिती येणार नाही.
विद्यार्थी : या मंडळींसाठी अभ्यासक्रमाचा ताण आणि इतर समस्यांमुळे हैराण झाल्यासारखे वाटेल,“अध्ययन एके अध्ययन” हे लक्ष ठेवल्यास अभ्यासक्रमाचे गणित सहज सुटेल. “कष्टाशिवाय तरणोपाय नाही” हे ब्रीद मनावर बिंबवावे.भरकटलेल्या मनाला आवर घालणे सर्वासी आपल्याच हाती राहील.पालक वर्गानी पाल्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यांना विश्वासात घेऊन संवादात भर दिल्यास आलेल्या तणावाचा निचरा निश्चित होईल.
कन्या
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला धन स्थानात येणारा बुध, ११ ऑक्टोबरला धन स्थानातुन तृतीय स्थानात जाणारा गुरु,१७ ऑक्टोबरला राशीतुन धनस्थानात जाणारा रवी आणि धनस्थानात असलेला शुक्र,चतुर्थात असणारा शनी पंचमात असलेले मंगळ-केतु हे ग्रहयोग पाहता कन्या राशीसाठी ऑक्टोबर महीना खडतर प्रवासाचा आणि संमिश्र फळांचा राहील.
आरोग्य : प्रकृतीच्या तक्रारी ह्याही महिन्यात सतावतील,ऋतु बदलानुसार होणारे आजार आणि मानसिक ताण-तणावाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे राहील.जुनाट व्याधी डोके वर काढतील.वैद्यकीय चिकित्सा आणि पथ्य पाळल्यास प्रतिकुल स्थितीला सामोरे जावे लागणार नाही.मानसिक प्रसन्नतेसाठी विशेष योजना आखल्यास उत्तम राहील.
आर्थिक: अर्थकारणाचे गणित चुकविणारा हा महिना राहील,ह्या महिन्यात काही अपेक्षित तर बऱ्याच अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल,त्यामुळे रिकाम्या खिशाचा मनावर ताण येईल.त्यातच उत्पन्नाची घसरण आणि देणिदारांचा तगादा राहील,अशा ह्या आर्थिक तणावाच्या वातावरणात कुठलेही महत्त्वाचे निर्णय न घेणे हितावह राहील.
नौकरी व्यवसाय : नौकरीच्या बाबतीत ह्या महिन्याकडुन फारश्या अपेक्षा ठेवुन चालणार नाही प्रसंगी तणावाला सामोरे जावे लागेल.ह्या महिन्यात कार्याचा तणाव आणि पसारा वाढल्यामुळे दगदग आणि धावपळ करावी लागेल.कामाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी प्रसंगी ओवह्र-टाईम करावे लागेल, एवढे करून ही वरिष्ठ खुश राहणार नाही.कामाच्या ठिकाणी एक मंत्र लक्षात ठेवावा लागेल “कल करे सो आज ,आज करे सो अब”
व्यवसाया बाबतीत हा महिना खडतर राहील आणि खाच-खळगे युक्त राहील.वाढीव आर्थिक तणावाचे सावट तसेच कामाचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे मानसिक अस्वस्थता ठायी-ठायी जाणवेल.भांडवलाची गरज भागवताना नाकीनऊ येतील हातातले भांडवल योग्य पद्धतीने हाताळणे हितावह राहील.वसुलीसाठी तगादा लावावाच लागेल अनपेक्षित खर्चाचा भार न पेलवाल्यामुळे मान-हानीचे प्रसंग उद्भवतील.
कोर्ट–कचेरी : याबाबत न्यायालयीन प्रक्रियेचा संथपणा परिक्षा पाहणारा राहील.त्यामुळे खटल्यातुन फार काही निष्पन्न होईल असा विचार करून चालणार नाही. “शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये” ही म्हण सार्थ करणारा हा महीना राहील. मनस्ताप आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागल्यामुळे न्यायालयीन व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्यासारखा वाटेल.
नातेसंबंध: या बाबतीत पुर्वार्ध उत्तम तर उत्तरार्ध अवघड अशी स्थिती राहील, नाते-संबंधात वावरताना पारदर्शकता आणि विश्वासयुक्त वाटचाल अपेक्षित राहील. उत्तरार्धात ग्रहांचा रेटा नातेसंबंधात तणाव निर्माण करेल, “पराचा कावळा” झाल्यामुळे मनस्ताप गैरसमज आदी गोष्टींना सामोरे जावे लागेल,जोडीदारा बाबतीत संयमी धोरण आणि सुसंवाद ठेवल्यास येणाऱ्या तणावाचे प्रसंग टाळता येतील,लहान-सहान वाटणारे मतभेद प्रसंगी विकोपास जाऊ शकतात.
विद्यार्थी : या मंडळीना नवीन अभ्यासक्रमाशी जुळवुन न घेतल्यामुळे अडीअडचणीत वाढ झालेली दिसेल.अभ्यासाशिवाय,अध्ययनाशिवाय पर्याय नाही.परिक्षेचा महिना असल्याने “अभ्यास ऐके अभ्यास” व अर्जुनाप्रमाणे फक्त डोळाच दिसला पाहीजे.सुजाण पालकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनाची योग्य ती काळजी घ्यावी,जेणेकरून पुढील होणारे यश-अपयशाचे प्रसंग टाळता येतील.
तुळ
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध व्येय स्थानातुन राशीत येईल,तर ११ ऑक्टोबरला गुरु राशीतुन धन स्थानात जाईल,१७ ऑक्टोबरला रवी व्येयातुन राशीत येईल,तर शुक्राचे भ्रमण संपुर्ण महिनाभर राशीत राहील,तृतीय स्थानात शनीचे भ्रमण चतुर्थामध्ये मंगळ-केतु आणि दशमामध्ये राहु ही ग्रहस्थिती पाहता तुळ राशीच्या जातकांसाठी हा महिना काही अप्रतिम फळ देणारा राहीलच त्याशिवाय काही महत्त्व पुर्ण घटनांची नांदी करणारा ही राहील.
आरोग्य : या बाबतीत हा महिना दिलासादायक उत्साहवर्धक आणि उमेद वाढविणारा राहील.खुप दिवसापासुनचे दुखणे आता रामबाण उपाय सापडल्याने एकदाचे मार्गी लागेल, परिपुर्ण चिकित्सेमुळे आरोग्यदायी परिपुर्ण अशी अवस्था निर्माण होईल.
आर्थिक : या बाबतीत या महिन्यात पुर्वार्धापेक्षा उत्तरार्ध हा जास्त सकारात्मक दिलासावर्धक आणि आर्थिक विवंचनेला संजीवनी देणारा राहील.उत्पन्नाचा आलेख उत्तरार्धात वाढण्याचे संकेत असल्यामुळे भावी जीवनाची तरतुद करून ठेवल्यास योग्य राहील.बचत आणि गुंतवणुक करण्यास हा काळ योग्य राहील.अशा ह्या उत्तम ग्रहमानाचे परिपुर्ण लाभ करून घेतल्यास अर्थकारणात उत्साह राहील.
नौकरी व्यवसाय: बऱ्याच दिवसानंतर नौकरीमध्ये चैतन्य आणि उल्हासदायक वातावरण निर्माण झाल्याने बरे वाटेल.काही बहुप्रतिक्षीत गोष्टींचा लाभ होईल.जसे की,बढती,जबाबदारी,बदली अथवा इतर बाबी.कामाचा वाढलेला आलेख कर्तुत्त्वावर शिक्कामोर्तब केल्याशिवाय राहणार नाही.हाच सळसळता उत्साह कायम ठेवल्यास पुढील काळाची बेगमी करता येईल,वरिष्ठ आणि सहकारी हे समाधान पावतील.नकारात्मक बाबींनी न डगमगता खंबीरपणे पाऊले टाकल्यास यश आपलेच आहे.
व्यवसाया बाबतीत पुर्वार्धात निर्माण झालेला अवरोध उत्तरार्धात कुठच्या कुठे निघुन जाईल,प्रगतीचा आणि यशाचा नवीन मापदंड साधल्या जाईल.दीर्घ काळापासुन प्रलंबित राहिलेली धोरणे आता अमंलात आणता येतील.विस्तारीकरण,नवीन व्यवसायाची मुहुर्तवेढ उत्तरार्धात सहज रोवता येईल.
कोर्ट–कचेरी : कोर्टकचेरी बाबतीत हा महिना एका नवीन वळणावर आल्यामुळे हायसे वाटेल.दीर्घ काळापासुन सुरु असलेले खटले आता अंतिम टप्प्यात येतील.वकिल मंडळीनी दिलेला सल्ला उत्तम प्रकारे लागु होईल,स्थावर मालमत्तेचे तसेच कौटुंबिक वाद समोपचाराने मिटवल्यास तंटामुक्तीचे धोरण सुलभ होईल.स्थावर मालमत्तेचे खटले मार्गी लागतील.
नातेसंबंध : नात्यांबाबत हा महिना सकारत्मकता घेऊन येत आहे.ह्या उत्तम ग्रहस्थितीचा पुरेपुर लाभ उठवल्यास जुने कौटुंबिक कलह आणि प्रापंचिक वाद सहज मिटवता येतील.कुटुंबात शुभ घटनांची नांदी होईल,स्वकीय आणि आप्तानं बरोबर गाठीभेटींना वेग येईल,चर्चेतुन उत्तम मार्ग निघेल.जोडीदाराबाबतीत मनस्वी घटनांना सामोरे जावे लागेल.अर्थात या मनस्वी घटना म्हणजे सहजीवनातील एक नवीन वळण असेल.जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.
विद्यार्थी : विद्यार्थी मंडळीसाठी शैक्षणिक वाटचालीतील हा एक शुभ महीना ठरेल,शुभ ग्रहांचे पुरेपुर लाभ करून घेतल्यास अभ्यासक्रमातील अडथळे दुर होतील.तसेच परीक्षानां सामोरे जातांना नवीन आत्मविश्वास जाणवेल.अभ्यासाचे तंञ सापडल्यामुळे यशाचा मार्ग मोकळा होईल,पालक वर्गानी आपल्या पाल्यांच्या प्रगती कडे योग्य लक्ष दिल्यामुळे आता यशाची फळे चाखता येतील.
वृश्चिक
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध व्येय स्थानात भ्रमण करेल,तर ११ ऑक्टोबरला बहुप्रतिक्षीत व्येय स्थानातला गुरु राशीत येत आहे.१७ ऑक्टोबरला लाभातुन रविचे भ्रमण व्येयात होईल,शुक्र ही व्येय स्थानामध्ये स्थित आहे.धन स्थानातला शनी साडेसातीची जाणीव करून देत आहे. तृतीय स्थानातला मंगळ-केतु आणि भाग्यातला राहु हे ग्रहांचे भ्रमण पाहता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना प्रतिकुलतेबरोबर खडतर प्रवासाचा राहील.
आरोग्य : पुर्वार्धात आरोग्याबाबतीत केलेली हेळसांड आता करून चालणार नाही. प्रकृतीकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे राहील,वेळीच केलेला वैद्यकीय उपाय बहुमोलाचा ठरेल,घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्यकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.उत्तरार्धात वैद्यकीय चिकत्सा या व्यतिरिक्त आहार,विहार,प्राणायम आदीबाबींची पुर्तता केल्यास आरोग्याचा लाभ होईल.
आर्थिक : आर्थिक बाबतीत हा महिना संमिश्र राहील, पुर्वार्धात व्येय स्थानात असलेले ग्रह खडतर आव्हानांना सामोरे जाण्याचे संकेत देतील.धन स्थानातील शनी चारही बाजुंनी आर्थिक कोंडी करत आहे.आर्थिक व्यवहार काहीसे अंगलट येतील,घाईने निर्णय घेऊन चालणार नाही.आकस्मित उद्भवलेल्या खर्चाची हाताळणी योग्य प्रकारे करावी.आर्थिक व्यवहार फसल्यामुळे आत्मविश्वास कमजोर होईल.
नौकरी व्यवसाय : नौकरीबाबतीत हा महीना ताणतणावाचा आणि धावपळ दगदगीचा राहील.कामाच्या ठिकाणी नको ते प्रसंग अनुभवयास येतील,प्रसंगी मान-अपमानाचे नाट्य रंगु शकते आहे.सहकारी आणि वरिष्ठां बरोबर वितुष्ट येईल लहान-सहान गैरसमज मोठे रूप धारण करतील.
व्यवसाया बाबतीत ग्रहांची हवी तशी साथ न मिळाल्यामुळे ह्या महिन्याकडून फारश्या अपेक्षा ठेवून चालणार नाही व्यवसायिक तणाव उत्तरेतर जाणवेल व्यवसाया बाबतीचे काही योजना आणि धोरणे मोठ्या काळासाठी लांबवाव्या लागतील.भांडवला बाबतीत चनचन भासेल.एकंदरीत आर्थिक समस्येत वाढ होईल.
कोर्ट–कचेरी : याबाबत ह्या महिन्यात प्रतिकुल फळांना सामोरे जावे लागेल.मनासारखे काहीच न घडल्यामुळे मन खट्टु झालेले असेल.बहुप्रतिक्षीत निकाल येण्यास अजुन विलंब राहील,मात्र हा निकाल प्रतिकुलतेकडे झुकु शकतो,त्यामुळे मानसिक आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल स्थावर मालमत्तेचे वाद विरोधात जातील.घटस्फोट अथवा कौटुंबिक खटल्यांबाबत प्रतिकुलता पदरात पडेल.
नातेसंबंध : महिन्याची सुरवात उत्साहवर्धक असेल,जसे जसे दिवस पुढे जातील तशी तशी नातेसबंधा बाबत प्रतिकुलता अनुभवयास येईल अचानक पणे उद्भवलेले वाद-विवाद कौटुंबिक कलहाचे प्रसंग उभे राहतील.आपलीच असलेली माणसे आपल्या विरोधात उभे ठाकतील अशा परीस्थित मन विदीर्ण होईल.जोडीदाराबाबतीत समन्वयी आणि संवादी भुमिका घ्यावी लागेल.सल्ला-मसलत,चर्चा-विनिमय आणि मान-पान याद्वारे संबंधात येणाऱ्या कटुतेवर सहज मात करता येईल.
विद्यार्थी : विद्यार्थ्यांसाठी हा महिना खरोखरच परिक्षा पहावयास राहणारा राहील.अभ्यासक्रमाचे आव्हान पेलताना त्रेधा-तिरपट उडालेली असेल,अभ्यासाच्या ताणामुळे गांगरून झाल्यासारखे होईल,विषयाचे योग्य आकलन न झाल्यामुळे शिकवलेला अभ्यासक्रमा समजणार नाही.विचलित न होता प्रयत्नपुर्वक अभ्यासाला लागावे.पालकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल असे वागावे,रागावण्यापेक्षा समजवण्यावर भर द्यावे.
धनु
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध लाभ स्थानात येत असुन,११ ऑक्टोबरला गुरुचे भ्रमण लाभातुन व्येयाकडे होईल,१७ ऑक्टोबरला दशमातुन लाभत येणारा रवी, लाभत असणारा शुक्र,राशीत असलेला शनी धनस्थानातले मंगळ-केतु अष्टमातला राहु हे,ग्रहमान पाहता धनु राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महीना हा उन्ह-सावलीचा खेळ पहावयास लावणारा राहील,प्रतिकुलता आणि अनुकुलता याचे पारडे क्षणोक्षणी इकडे तिकडे होत राहील,त्यामुळे काय खरे आणि काय खोटे असा संभ्रम निर्माण होईल.
आरोग्य : या बाबतीत धनु राशीच्या जातकांनी सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे.वातावरणातील बदलांच्या झळा प्रकृतीला मानवणार नाहीत.लहान-सहान आजारांकडे वेळीच लक्ष द्यावे,घरामध्ये स्वच्छता बाळगावी जेणे करून कीटकांचा आणि डासांचा प्रादुर्भाव होणार नाही.लहान-सहान दुखापतीनं सामोरे जावे लागेल.तणाव आणि ताणाचे सुयोग्य नियोजन केल्यास उत्तम राहील घरातील मंडळींच्या आरोग्याकडे डोळ्यात तेल घालुन लक्ष द्यावे.
आर्थिक : आर्थिकबाबती मध्ये हा संपुर्ण महिना पदरी निराशा पडणारा राहील,उत्पन्न कमी आणि सतत नुकसानीची मालिका सुरु राहील त्यामुळे बिघडलेले आर्थिक ताळतंत्र आणि परीस्थी वरचे सुटलेले नियंत्रण हा महीना आर्थिक तणावात भर घालणारा राहील. खर्चाचा वाढलेला आलेख भागवताना मन विषन्न झालेले असेल. एखादा निर्णय किंवा अति साहस अंगाशी येईल.संपुर्ण महिनाभर आर्थिक दक्षता आणि सुरक्षितता पाळावी.गरजांवर नियंत्रण आणि प्रचंड आर्थिक कपात या सुत्रामुळे महिना कसा बस पुढे रेटता येईल.
नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत याही महिन्यात फारसे उल्हासवर्धक वातावरण जाणवणार नाही.नियोजित कामाचा वेळीच निपटारा न झाल्यामुळे कामांचा खच साचुन राहील.त्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील सहकारी आणि हाताखालची मंडळी आपल्याच तोऱ्यात वागतील नौकरी सोडायच्या विचारात असाल तर थोडा संयम धरावा. “हातातल सोडुन पळत्याच्या मागे धावल्या सारख होईल”.
व्यवसायातील “आस्ते कदम” हे धोरण महिनाभर राबविल्यास संभाव्य आर्थिक तणावाला नियंत्रित करता येईल.हाती पैसा न आल्यामुळे सगळ्याच योजना बारगळतील नफा-नुकसानीचा अंदाज कुठल्या कुठे विरून जाईल.आला दिवस काढणे एवढेच हातात राहील त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी ठेवावी.
कोर्ट–कचेरी : याबाबत कोर्टाच्या पायरीपासुन दुर राहिलेलेच बर चालु असलेल्या दाव्यातुन हाती काहीच निष्पन्न होणार नाही,प्रसंगी मानहानी आणि नुकसान याशिवाय पदरात काहीच पडणार नाही.स्थावर मालमत्तेचे खटले पुढे ढकलावे.घटस्फोट आदी दावे रेंगाळतील वकील मंडळींशी वाद न घालता जुळवून घ्यावे.
नातेसंबंध : महिन्याचा पुर्वार्ध नातेसंबंधावर उत्तम परिणाम करणारा राहील.हाच परिणाम उत्तरार्ध नंतर प्रतिकुलतेकडे झुकेल,वाद होतील असे प्रसंग टाळावे,जोडीदारा बरोबर समन्वय साधण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.एकंदरीतच सर्व नातेसंबंध उत्तरार्धात होरपळणारे अनुभव देणारे राहतील.
विद्यार्थी : विद्यार्थी मंडळीनी “अभ्यास ऐके अभ्यास” असे धोरण ठेवावे.अभ्यासाचा साचलेला तणाव सुनियोजित पद्धतीने दुर करण्यासाठी एखादा छंद जोपासावा अथवा व्यायामशाळा,योगासने अथवा क्रीडा प्रकारचा लाभ घ्यावा.अभ्यासवरून उडालेल लक्ष जाणीवपुर्वक अभ्यासावर केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयास करणे गरजेचे आहे.परीक्षेतील आव्हानांना विशेषपणे सामोरे जावे.पालक वर्गानी पाल्यांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष पुरवावे.
मकर
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध दशमा मध्ये येत असुन,११ ऑक्टोबरला गुरु लाभ स्थानी येत आहे.१७ ऑक्टोबरला रवी भाग्यातुन दशमात येईल.शुक्र दशमात भ्रमण करेल,शनी व्येय स्थानामध्ये असेल,मंगळ-केतु राशी मध्ये तर सप्तम स्थानामध्ये राहुचे भ्रमण राहील.ही ग्रह स्थिती पाहता मकर राशीसाठी हा महिना पुर्वार्धात प्रतिकुल तर उत्तरार्धात अनुकुल असा संमिश्र फलदायी राहील.
आरोग्य : आरोग्याबाबती मध्ये हा महिना तब्येतीची काळजी घ्यावी अस सांगणारा राहील.मागील काही दिवसांपासुन आरोग्याच्या कुरबुरी वाढीस लागल्यामुळे सातत्याने तणाव जाणवत आहे.गुरुचा लाभतील प्रवेश या तक्रारी बाबत दिलासा नक्कीच देईल.घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याकडे जातीने लक्ष द्यावे.
आर्थिक : साडेसातीच्या प्रभावामुळे सुरु झालेली आर्थिक घसरण पुढे ही सुरूच राहील. ह्या महिन्यात मात्र उत्पन्नाचा घटलेला आकडा आणि खर्च तसेच देणी यांचा फुगलेला आकडा घरगुती वाद आणि तणावाला आमंत्रण देणारा राहील काही कठोर योजना राबवाव्या लागतील.त्यातही पुर्वार्ध प्रचंड त्रासदायक असु शकतो आहे.आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी.
नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीमध्ये हा महिना खुप दिवसांपासुन साचलेला तणाव हळुहळु निवळू लागेल लाभत आलेला गुरु संपूर्ण ग्रहमान तोलून धरत आहे.कामाच्या ठिकाणी आलेला संथपणा आणि निरुत्साह महिन्याच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी निघुन जाईल,नवीन संधी च्या शोधात असणार्यांनी मात्र काही काळ वाट पाहणे सोयीस्कर राहील.मानसिक तणावाचे सावट कामावर येऊ देऊ नका.
व्यवसायाबाबतीत हा महिना काही आघाड्यांवर दिलासा दायक तर काही आघाड्यांवर चिंता करावयास लावणारा राहील.पुर्वार्ध खडतर भासेल प्रत्येक कामामध्ये अडचणी ठरलेल्या राहतील.उत्तरार्धात मात्र योग्य दिशेने वाटचाल सुरु होईल.आर्थिक स्त्रोत मोकळे झाल्याने पैश्या अभावी रखडलेली काम सुरळीत होतील,मात्र कामाचा बोजा धावपळ वाढवणारा राहील.
कोर्ट-कचेरी : साडेसातीमुळे दाव्या बाबतीत संथ गती राहील, खटल्यां बाबतीत फक्त तारखा पडतील चिकाटीने प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केल्यास काही दाव्यांचे निकाल अनपेक्षितपणे हाती येतील,मात्र आलेला निकाल दिलासादायक राहणार नाही.उत्तरार्धात मात्र चित्र बदलेल असेल,स्थावर मालमत्तेचे खटले पुढे ढकलावेत.शक्यतो कोर्टा बाहेर प्रकारणे मिटवल्यास योग्य राहील.
नातेसंबंध : नात्यांमध्ये समस्याच अधिक आणि सुखदायी प्रसंग कमी असे भ्रमण राहील.ग्रहस्थिती कडुन फारश्या अपेक्षा ठेऊन चालणार नाही.झालेले वाद अथवा गैरसमज मिटविण्यास प्राधान्य द्यावे.उत्तरार्धात गुरुचे बळ मिळाल्यामुळे नात्यात सुधारणा घडवुन आणेल.चर्चा विनिमय केल्यामुळे समस्यांवर मार्ग निघेल.सणावारला आप्तेष्टांच्या भेटीगाठी झाल्यामुळे उत्साह जाणवेल.जोडीदाराबाबतीत सौख्याची पखरण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
विद्यार्थी : विद्यार्थी मंडळींना हा महीना परीक्षेसाठी भरपुर उर्जा पुरविणारा राहील. मिळवलेल्या उर्जेचे रुपांतर यशामध्ये कसे करायचे,याच्यावर बऱ्याचश्या गोष्टी अवलंबुन राहतील.अभ्यासक्रमाची आता योग्य सांगड लागेल.पालक मंडळीनी विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उबलब्ध करून दिल्यास त्यांच्या कडुन योग्य मेहनत नक्कीच होईल.
कुंभ
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध अष्टमातुन भाग्यात येईल,११ ऑक्टोबरला गुरु भाग्यातुन दशमात येईल.१७ ऑक्टोबरला अष्टमातुन रवी भाग्यात येईल,तुळ भाग्यात असुन मंगळ-केतु युती व्येय स्थानात स्थित राहील,शनी लाभ स्थानामध्ये,राहु षष्टामध्ये हि ग्रह स्थिती पाहता कुंभ राशीचे ग्रहमान खडतर,आव्हानात्मक आणि प्रतिकुल असेल.मात्र राशी स्वामी शनी लाभत असल्यामुळे महिना तसा प्रगतिकारकच राहील.
आरोग्य : आरोग्याबाबतीमध्ये हा महिना लहान-सहान तक्रारींनी युक्त आणि मानसिक चिंता आणि क्लेश वाढवणारा राहील,एखादी लहान-सहान दुखापत ही होऊ शकते दक्ष राहिल्यास फारसे गंभीर घडणार नाही.लहान सहान तक्रारींना डोके वर काढू देऊ नका.वैद्यकीय चिकित्सा आणि सरळ साध्या उपायांनी स्थिती आटोक्यात आणता येईल,मन प्रसन्न ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
आर्थिक : आर्थिक स्थिती तशी प्रगती कारकच म्हणता येईल,आर्थिक उत्पन्नाचे स्रोत आणि आवक उत्तम राहील,कर्जफेडी साठी हा महिना उपयुक्त राहील कर्ज फेडिला प्राधान्य द्यावे.उत्तरार्धात स्थावर मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील.गुंतवणूक आणि बचतीचे धोरण दीर्घ काळाचे आर्थिक नियोजन ठरवु शकेल .
नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना उत्तम प्रगती साधणारा रहील.पुर्वार्धातील संथ प्रक्रिया उत्तरार्धात वेग घेईल.कामाच्या ठिकाणी मान-सन्मानाचे तसेच वाढीव जबाबदारी मिळण्याचे संकेत राहतील.नवीन नौकरी शोधणाऱ्यानी थोडी अजुन प्रतीक्षा करावी.असे जरी चांगले ग्रहमान असले तरी कुठेही गाफिल राहून चालणार नाही.दक्षता ही बाळगावी लागेल.
व्यवसायाबाबती मध्ये पुर्वार्ध संथ राहील तर उत्तरार्ध कामानां गती आणणारा महिना राहील.नवीन करार-मदार दृष्टीक्षेपात येतील विस्तारी करणाचे धोरणे राबविण्याची हि वेळ असेल मात्र भांडवलाची उत्तम व्यवस्था आणि सुनियोजित पद्धतीने वाटप करावे लागेल.नवीन करार-मदारातुन व्यवसायाला उत्तम रूप अंत येईल.
कोर्ट-कचेरी : बहुप्रतिक्षीत खटल्यातुन आता मुक्त होण्याची वेळ आलेली असेल.निवडा योग्य पद्धतीने झाल्याने एक प्रकारचा तणाव मुक्ती अनुभवयास येईल, स्थावर मालमत्तेचे वाद उत्तमरित्या मिटवले जातील,वकिल मंडळींचं सहकार्य लाभल्यामुळे न्यालयीन प्रक्रियेत वेग येईल,एकंदरीत हा महीना प्रचंड दिलासा देऊन जाईल.
नातेसंबंध : नात्यांन बाबतीत ह्या महिन्यात काही अविस्मरणीय अनुभव येतील.तसा काही फारसा तणाव नातेसंबंधात जाणवणार नाही.नातेवाईक आप्तेष्ट अथवा कौटुंबिक सदस्यांशी उत्तम गाठ-भेट होईल.या भेटींमुळे जिव्हाळा वाढेल आत्मीयता वाढेल,एकमेकांचे आनंद वार्ता आणि सुखदु:ख जाणुन घेता येतील.जोडीदाराशी नरमाईचे धोरण ठेवल्यास प्रापंचिक सौख्य उत्तम मिळेल.वैवाहिक जीवनात काही उत्तम प्रसंगांना सामोरे जावे लागेल.
विद्यार्थी : या मंडळींसाठी अध्यनाची नवीन दिशा ठरविणारा हा काळ राहील. अभ्यासक्रमाशी समरूप झाल्याने विषयाचे आकलन आणि अभ्यासाचे तंत्र आत्मसात करता येईल.पालक मंडळीनी विद्यार्थ्यान कडुन उत्तम अभ्यास करून घेतल्यास आणि प्रसन्न वातावरण ठेवल्यास यशाची अपेक्षा करायला हरकत नाही.
मीन
ग्रहांची स्थिती : ६ ऑक्टोबरला बुध अष्टमात जात असुन,११ ऑक्टोबरला गुरु अष्टमातुन भाग्यात जात आहे.१७ ऑक्टोबरला रवी सप्तमातून अष्टमात जाईल शुक्र अष्टमात असेल.शनी दशम स्थानामध्ये स्थित असेल लाभ स्थान मध्ये मंगळ-केतु आणि पंचमात राहु ही स्थिती पाहता मीन राशीसाठी संमिश्र फलदायी राहणार आहे.गुरूच राशांतर उत्तरार्धात अनुकुलता पुरवणारी राहील.
आरोग्य : दिर्घकाळा पासुन अष्टमात ठाण मांडुन बसलेला गुरु प्रकृतीला फारसा अनुकुल नव्हता,मानसिक ताणतणाव आणि व्याधी यांनी ग्रस्त अशी स्थिती होती.उत्तरार्धात ह्या स्थिती आता बदल होत जाईल.शारिरीक खच्चीकरण आता निघुन जाईल नवीन उमेद नवा उत्साह संचारेल.
आर्थिक : काही महिन्यान पासुन सुरु असलेली आर्थिक घसरण थांबता थांबायचे नाव घेत नव्हती मात्र ह्या महिन्यात ह्या स्थितीत अमुलाग्र बदल अपेक्षित राहील आर्थिक दिलास्यामुळे प्रश्न सुटण्यास मदत होईल तरी हि सर्व व्यवहार दक्षता पुर्वक करावेत.
नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत पुर्वार्ध खडतर समस्यांनी युक्त आणि अतिशय प्रतिकुल असा राहील आला दिवस काढणे एवढेच हातात राहील.व्यवहारिक गोष्टींच भान ठेवुन काही निर्णय प्रक्रिया राबवावी लागेल.कामाच्या वाढत्या तणावामुळे आणि कामाच्या ठिकाणी असणाऱ्या तणावामुळे वैतागलेले मन नौकरी सोडावी का? अशी टोकाची भमिका घेऊ शकते.तरिही संयम बाळगुन कुठलाही आतातायी निर्णय घेऊ नये.
व्यवसाया बाबतीमध्ये महिन्याचा पुर्वार्ध तणाव पुर्ण आणि अडचणीयुक्त राहील,देणीदारांचा प्रचंड तगादा आणि ठप्प झालेलं उत्पन्न यामुळे काहीच सुचेनासे होईल,मात्र ११ ऑक्टोबर नंतर थोडेसे चित्र पालटेल,थोडा दिलासा मिळेल,काही उपाय योजना राबविल्यास पुढील वाटचालींनी मार्ग सुकर होईल.
कोर्ट-कचेरी: या बाबतीत हा महिना दिलासादायक नक्कीच नाही.काहीही निकाल लागला तरी तो मनाविरुद्ध नक्की असेल.प्रसंगी त्यातुन ताण आणि आर्थिक दंड होण्याचे संकेत असेलउत्तरार्धात मात्र ग्रहांची अनुकुलता मिळाल्यामुळे दिलासा मिळेल.स्थावर मालमत्तेचे खटले मार्गी लागतील.
नातेसंबंध : आठव्या गुरुत नाते संबंधाची झालेली हानी आणि गैरसमज यामुळे प्रचंड तणाव झेलावा लागलेला असेल,उत्तरार्धात गुरुचे पाठबळ ह्या संपूर्ण प्रक्रियेतुन सुटका करून देणारा राहील.नातेसंबंधात झालेली सुधारणा आणि मिटलेले गैरसमज दिलासादायक राहतील,नातेवाईक आणि आप्तेष्ट यांचे मिळालेले सहकार्य अनेक समस्यांचे समाधान होईल.जोडीदाराबाबतीत काही तणावाचे प्रसंग उद्भवल्यामुळे भांबवुन गेल्यासारखे झालेले असेल.उत्तरार्धात थोडासा दिलासा मिळेल.
विद्यार्थी : या मंडळींसाठी महिन्याचा प्रवास प्रतिकुलतेकडुन अनुकुलतेकडे जाणारा राहील.अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास एकाग्रता वाढेल,भरकटलेल्या मनाला आवर घालावा लागेल,परीक्षेची तयारी जोमाने आणि उत्साहाने करावी.पालक मंडळीनी सजग राहावे,पाल्यांकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
|| शुभम भवतु ||