! नवरात्र उत्सव  : पुजन  शक्तीचे, पर्व मांगल्याचे, जतन संस्कृतीचे !

अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४०,विलंबी नामसंवत्सर,दक्षिणायन शरद ऋतु,विक्रमार्क संवत २०७४, इसवीसन १० ऑक्टोबर २०१८, वार बुधवार रोजी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सव आरंभ होता आहे.शाक्त परंपरेतील हा अतिशय महत्त्वाचा,प्रचंड उत्सवाचा असा पर्वकाळ आहे.शक्तीचे पुजन हा या उत्सवाचा गाभा असुन ,मांगल्याची अनुभूती,प्रसन्नतेचा दरवळ आणि समृद्धीचा,सौख्याचा पर्वकाळ आहे.शरदऋतु मध्ये साजरे होणारे हे पर्व शारदीय नवरात्र म्हणुन प्रसिद्ध आहे.

निसर्गचक्रामध्ये हा काळ अतिप्रसन्नतेचा असतो.शरद ऋतुचे आगमन झालेले असते,परतीचा पाऊस आपली शेवटची पाखरण करून गेलेला असतो.धरित्री तृषार्थ झालेली असते,वसुंधरेन वरुणाच्या कृपा प्रसादाने हिरवकंच शालु धारण केलेला असतो.अशा या अल्हाददायक सुमधुर वातावरणामध्ये भाद्रपदला निरोप देताना पितृलोकातील पितरांना निरोप दिलेला असतो.कालचक्राशी सुसंगत असावे ह्या उदात्त हेतुने ऋषीमुनी,महर्षींनी सण,उत्सव ,परंपरा,रूढी यांची उत्तम सांगड घालुन ठेवली आहे.एक पर्व संपते न संपते त्यासाठी मनुष्य  तत्पर असतो कर्मसिद्धांताचा ह्यापेक्षा उत्तम अविष्कार तो काय ?

मनुष्याला सतत कार्यमग्न ठेवणे आणि त्याहीपेक्षा सतत मांगल्याची प्रसन्नतेची पाखरण करणे.जेणेकरून मन प्रसन्न टवटवीत राहील हा उदात्त हेतु पुर्वासुरींनी योजिला होता.असाच एक पर्वकाळ म्हणजे नवरात्र उत्सव अश्विन प्रतिपदेपासुन दशमी पर्यंत चालणारा हा उत्सव असुरी ,दृष्ट शक्तींचा निपात करून त्यावर मिळवलेल्या विजयाचे उत्तम प्रतिक आहे.देवीने केलेल्या दृष्ट शक्तींचा निपात म्हणुन शाक्त परंपरेत याला अतिशय महत्त्व आहे.शाक्त परेंपरेमध्ये श्री महाकाली ,श्री महासरस्वती ,श्री महालक्ष्मी या ३ श्रेष्ठ शक्तींना केंद्र स्थानी योजुन या शक्तींचे दिव्य पुजन ,सृजन,नमन करण्याचा हा पुण्यकाळ आहे.

भारतीय परंपरा आणि संस्कृती किती विशाल आहे,याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा नवरात्र उत्सव होय.अनादी काळापासुन स्त्रीला शक्ती रूपाने पुजले जात आहे.स्त्री शक्तीला केंद्र बिंदु मानुन दिले गेलेले महत्त्व हिंदु संस्कृतीची जगाला दिलेली उत्तम अशी देणगी आहे.ज्यामध्ये कुठलाही लिंगभेद न मानता स्त्रीला अत्यंत पवित्र मानुन शक्ती संकल्पनेतील अत्युच्च स्थान तिला दिल आहे.प्राचीन काळातील मातृसत्ताक पद्धती याला दुजोरा देत आहे.प्राचीन हिंदु वैदिक संस्कृतीतील हा अत्यंत असा मानाचा ठेवा आहे.

नवरात्र संकल्पना म्हणजे ९ दिवस आणि ९ रात्री केलेला देवीचा अखंड जागर अथवा कुलोपचार हा होय.यातील प्रत्येक दिवसाला माळ असेही म्हणटले जाते.नवरात्राचा आरंभ घट स्थापन करून केल्या जातो,घराची उत्तम साफ सफाई करून प्रसन्न वातावरणा मध्ये मातीच्या घटाची स्थापना करून त्यात धान्य पेरली जातात.घटावर आणखीन एक पात्र ठेवुन देवी अथवा कुलदेवीची मुर्ती स्थापिल्या जाते किंवा नारळ ही स्थापन केल्या जाते.

पहिल्या माळे पासुन ते नवमि पर्यंत पुजा केली जाते,अखंड नंददीप ठेवल्या जातो.हा अखंड नंददीप कायम तेवत राहील याची दक्षता घेतली जाते.या नऊ दिवसात हवन,सप्तशती पाठ ,उपवास ,जप आदी विधी केले जातात.ह्या ९ दिवसाच्या साधनेमध्ये जप,तप उपवास,ध्यान,हवन,नंदा-दीप प्रजव्वलन आदींनी उल्हासित होऊन मानसिक बळ प्राप्त होते.हा सगळा पर्व शक्ती पुजनाचा असुन  आणि शक्ती म्हणजेच उर्जा होय.या उर्जेच संचालन परिवहन आणि वितरण योग्य प्रकारे व्हावे हा हेतु या उत्सवाचा आहे.संपुर्ण वर्षामध्ये ह्या शक्ती पर्वाचे ४ पर्व अधोरेखित करण्यात आले असुन या मध्ये चैत्र,आषाढ अश्विन आणि माघ हे ते पर्व होय ह्या मध्ये अश्विन शारदीय नवरात्र उत्सवाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे.ह्या उर्जा स्तोत्राच आणि शक्ती स्तोत्राचा नऊ रुपात योजिला असुन,देवीचे हे नऊ शक्ती स्वरुप म्हणजे शैल पुत्री ब्रम्ह्चारिणी,चंद्रघंटा,कुष्माण्डा,स्कंधमाता,कात्यायनी,कालरात्री,महा गौरी ,सिद्धधात्री.प्रथम माळेला शैल पुत्री स्वरुपात देवीच पुजन केल्या जाते.पार्वतीदेवी जी हिमालयाची पुत्री होती.द्वितीया तिथीची देवी आहे ब्रम्हचारिणी ,तृतिया तिथीची चंद्रघंटा,चतुर्थीची कुष्माण्डा,पंचामीची स्कंध माता,षष्टीची कात्यायनी,सप्तमीची कालरात्री, अष्टमीची महागौरी,नवमीची सिद्धीदात्री देवी आहें.

प्रत्येक माळ हा सृजनशीलतेचा उत्सव आहे. घटस्थापना म्हणजे प्राचीन परंपरा आणि रूढी साजरी करतांना कृषी परंपरा जपण्याचाही जागर असतो.शेतातली माती घटात, नवअंकुर रुजविते.धान्य पेरलेले अंकुरतात.हीच खरी नवनिर्मिती होय. मातीशी नाते  घट्ट करणारे हे सृजन होय.नवरात्री मध्ये नवउन्मेष प्राप्त होणे ,शक्तीचे अडी स्वरूप पूजाने शक्ती चे त्रिरूप अर्थात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी,श्री महा सरस्वती या दिव्य शक्तींचा कुलोपचार यथायोग्य करणे,यामध्ये ९ दिवस ९ रात्र पुजाअर्चा,हवन,उपवास,अष्टमी किंवा नवमीला हवन,पंचमीला ललिताव्रत,अष्टमीला जोगवा मागण्याची परंपरा आहे.कुमारिका पुजन ,कुष्मांड पुजन किंवा बळी आदी विधी नवरात्री मध्ये संपन्न करता येता येतात.अष्टमी आणि नवमी या तिथींना विशेष महत्त्व आहे.असे हे आनंददायी पर्व आपल्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येवो.

सर्व मंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थ साधिके |शरण्ये त्रांब्याके गौरी | नारायणी नमुस्तुते |

 

!!!!!!शुभम भवतु!!!!!