बहुप्रतिक्षीत गुरु पालट : गुरुचा वृश्चिक राशीतील प्रवेश

विलंबी नामसंवत्सर शके १९४०,विकर्माक संवत २०७४ ,दक्षिणायन शरद ऋतु ,अश्विन शुक्ल पक्ष तृतीय अर्थात इसवीसन ११ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात गुरु हा ग्रह तुळ राशीतुन वृश्चिक राशीत प्रवेश करतो आहे.गुरु च्या ह्या राशांतराला ज्योतिष्यशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असुन याला गुरु पालट असेही म्हणतात.

अश्विन शुक्ल नवरात्री मध्ये तृतीय तिथीला गुरुवारी आणि विशेष म्हणजे विशाखा नक्षत्री म्हणजे गुरु च्या च नक्षत्री या गुरु पालटला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.ह्या गुरु च्या स्थित्यंतराचा पुण्य काळ गुरुवारी संध्याकाळी ५.२९ ते रात्री ९.११ पर्यंत आहे.या पुण्य काळात गुरूचा जप गुरुचे दान,गुरूची पुजा केल्यास उत्तम फळ प्राप्त होते.

चंद्र राशीपासुन द्वितीय,पंचम,सप्तम,नवम आणि लाभ(अकरावे) स्थानातील हा गुरु सर्व साधारणपणे शुभ असा मानल्या जातो.आणि चतुर्थातला ,अष्टमातला आणि बाराव्या स्थानातला गुरु हा अशुभ फळ देणारा असतो.

गुरूचा जप – ऊँ देवानांच ऋषींणांच गुरु कांचनसान्निभम् |

बुद्धिभुत त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ||

बीजमंत्र –   ऊँ ग्रां ग्रीं ग्रों सह गुरवे नम: |

गुरुचे दान : – पिवळे फळ ,पिवळे वस्त्र ,पिवळी फुले ,हरभऱ्याची डाळ,सोने,पुष्कराज रत्न

वृश्चिकेतला गुरु हा तुळ राशीसाठी दुसरा,कर्क राशीसाठी ५ वा,वृषभ राशीसाठी ७ वा,मीन राशीसाठी ९ वा,मकर राशीसाठी ११ वा म्हणजे लाभातला त्यामुळे या राशींचे भाग्य वृद्धिंगत होणार असुन या राशीच्या जातकांना उत्तम फळे प्राप्त होतील.मेष साठी ८ वा,सिंह राशी साठी ४ था, धनु राशी साठी १२ वा येणारा गुरु हे अनिष्ट राहतील.

गुरु …..अर्थात बृहस्पती ग्रह नावात च सगळ काही आल.गुरु चे बळ राशी चक्रात आले तर अंगात दहा  हत्तींचे बळ संचारते.‘गुरुबळ’ ह्या शब्दाला ज्योतिष्यशास्त्रात फार महत्त्व आहे.गुरु हा सोख्य,विद्या,विवेक,बुद्धी,धर्म,अध्यात्म,ज्योतिष्य,संतान,पुत्र,सुवर्ण आदींचा कारक ग्रह असतो.आरोग्याचक्रामध्ये पचनसंस्था,पोट,यकृत,हृदय,कारण,आदींचे कार्य गुरूच्या कारकत्वाखाली येते.

जन्म पत्रिकेतील गुरूची स्थिती अशुभ तत्वात किंवा अशुभ ग्रहांच्या संर्दभात झाली तर वरील कारकत्वा बाबत गुरु अनिष्ट फळ देतो.गुरूची शुभ स्थिती  किंवा गुरु चे बळ मग ते जन्म पत्रिकेतील असो किंवा गोचर भ्रमणातील असो त्यामुळे जातक जीवन रुपी भवसागरातील लाटांवर तरून जातो.गुरु ग्रह राशी चक्रातील सर्व राशीत सर्वसाधारणपणे वर्षभर वास करतो .ह्या गुरु च्या मार्ग क्रमाणामध्ये काही काळ वक्री आणि अतिचारी मार्गाने भ्रमण करतो.सर्वसाधारण ग्रहांच्या अंतरिक्षातील संचारा मुळे पृथ्वी आणि सुर्य यांच्या गती मुळे बदल होत असतात.

राशी नुसार गुरूची फळे:

मेष : मेष राशीला अष्टम स्थानात गुरु येत असल्यामुळे आर्थिक स्थितीत झपाट्याने उतार चढाव जाणवतील.तसेच कर्ज प्रकरणामुळे मनस्ताप आणि ताणतणाव राहील.प्रापंचिक सौख्यामध्ये कमतरता येईल अनिष्ट दायी अनुभव जीवनात येतील.आरोग्यबाबतीत तक्रारी जाणवतील.

वृषभ : सप्तम स्थान मध्ये गुरु चे भ्रमण विशेष फलदायी राहणार असुन सर्व कार्य सिद्धी धनलाभ,कार्यामध्ये नाव लौकिक विघ्नानवर मात आणि जीवनामध्ये भाग्य कारक घटनांची अनुभूती अशी फळ मिळतील.विवाह व संतती बाबतीत शुभ संकेत आहे.

मिथुन : गुरु षष्ट स्थानात भ्रमण करेल,त्यामुळे शत्रुपीडा सहकारी अथवा नौकारदार वर्गाकडून असहकार्य आणि आरोग्या बाबतीमध्ये चिंता युक्त ग्रहमान अशी फळ राहतील.एखादे  कर्ज प्रकरण मन:स्ताप  देऊन जाईल.मोठा भुर्दंड सोसावा लागेल आर्थिक नुकसानीचे योग राहतील.

कर्क : चतुर्थ स्थानातुन पंचमा मध्ये होणारे गुरु चे भ्रमण हे अत्यंत शुभदायी असुन शिक्षण ,उच्चशिक्षण ,स्पर्धा परीक्षा ह्या मध्ये उत्तमोत्तम यश संभवते आहे .तसेच अपत्यप्राप्ती,विवाह आणि कौटुंबिक सौख्य या बाबतीत शुभ फळे अपेक्षित आहे.स्थावर मालमत्तेचे लाभ राहतील.प्रगतीसाठी कालखंड अतिशय उत्तम व योग्य राहील.

सिंह : चतुर्थात येणारे गुरुचे भ्रमण हे ताणतणाव अस्थिरता आणि अडचणीयुक्त राहील.दगदग धावपळ जास्त आणि यश कमी ,मनस्ताप जास्त आणि सौख्य कमी असा उन पावसाचा खेळ राहील .वाहन,वास्तु आणि धन याबाबतीत अनिष्टदायी फळ मिळतील.जपुन असने,दक्ष असने योग्य राहील.

कन्या : कन्या राशीच्या तृतीय स्थानामध्ये गुरु चे भ्रमण वर्षभर राहील उत्पन्न कमी व खर्च जास्त अशी स्थिती राहील शारिरीक कष्ट उद्भवतील .भावंडाशी  वादाचे प्रसंग येतील प्रापंचिक अडी-अडचणींना सामोरे जावे लागेल,भयगंड जागृत होईल.

तुळ : तुळ राशीसाठी धन स्थानात गुरुचे भ्रमण होत आहे.कौटुंबिक सौख्यात वाढ कुटुंबा मध्ये काही मंगळ दायक प्रसंग ,उत्तम धनप्राप्ती,शुभ अध्यात्मिक कार्याचे नियोजन धार्मिक पर्यटन,मानसन्मान आदी योग राहतील.

वृश्चिक : राशीत येत असलेला गुरु जरी उत्तम असला तरी संघर्षदायी असतो .भयगंड जागृत झाल्यामुळे मनावर दडपण आणि तणाव राहील .कुठल्याही नियोजित कार्यामध्ये प्रचंड मेहनत ओतावी लागेल.अपेक्षित यश मिळवताना दमछाक होईल १२व्या गुरूचा तणाव निवळलेला असेल.

धनु : राशीच्या १२ व्या स्थानात गुरु येत असुन ,१२ वा गुरु हा खर्चाचे प्रमाण वाढविणारा राहील नियोजित कार्यांमध्ये विघ्न मानसिक चिंता आदी राहतील.कर्ज प्रकरण अंगलट येईल.धार्मिक कार्यांमध्ये,अध्यात्मामध्ये रुची वाढेल.परदेशगमन योग राहतील.

मकर : मकर राशीच्या लाभस्थानामध्ये गुरुचे भ्रमण होणार असुन मकर राशींसाठी अत्यंत शुभदायी असा गुरूचा पर्व राहील.धनलाभ,यश,मान सन्मान,आदी योग येतील.नवीन कार्याची मुहुर्तवेढ रोवल्या जाईल.नौकरी व्यवसायामध्ये उत्तम लाभ राहतील.शुभ कार्य मंगळ कार्याचे नियोजन होईल.

कुंभ : दशम स्थानात येणारा गुरु कार्य हानी दर्शवितो आहे.नौकरी मध्ये विघ्न,अडीअडचणी असा काळ राहील.मनाविरुद्ध बदल करावा लागेल.मेहनती नंतर यश प्राप्त होईल उत्पन्न कमी आणि खर्च जास्त राहील निर्णय घेताना काळजी घ्यावी वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

मीन: भाग्य स्थानात येणारा गुरु प्रदीर्घ काळापासुन वंचित कार्यामध्ये  यशदायी राहील.अडकलेले थांबलेले कार्य मार्गी लागेल मानसिक चैतन्य निर्माण होईल.अध्यात्मिक प्रगती होईल.भावंडाशी गाठभेट अथवा मिलाप राहील.संतती बाबतीत शुभ वार्ता मिळतील.

असा हा गुरु आपण सर्वाना सौख्यदायी फळ देवो या शुभेच्छा सह शुभम भवतु !!!!!!!

 गुरु बळासाठी विशेष उपाय

  • गरीब अथवा गरजुंना अन्नदान
  • गुरुवार चा उपवास
  • औदुंबर पुजन
  • पुष्कराज रत्न धारण करणे
  • धार्मिक ग्रंथांचे वाटप
  • सुवर्णदान
  • गुरु बीजमंत्राचा १९,००० जप