होळी:हुताशनी पौर्णिमा:होलिका प्रदीपन:धुलीवंदन:रंगोत्सव

विलंबी नाम संवत्सराची सांगता होळीच्या पर्वाने होत आहे.शके १९४० विलंबी नाम संवत्सर फाल्गुन शुक्ल पौर्णिमा इंग्रजी २० मार्च २०१९ ला होळी साजरी करत येईल.होलिका प्रदीपन विधी रात्री ८.५७ मिनिटानंतर म्हणजेच भद्रा योग संपल्यावर चा मुहुर्त आहे.हिंदु वर्षानुसार हा वर्षातील सगळ्यात शेवटचा सण असतो. हिरण्यकश्यपाची बहिण होलिका हिचे दहन करतात.त्याचे कारण असे आहे की,ती असुरशक्ती असुन अग्नीच्या माध्यमाने भक्त प्रल्हादाला जाळुन मारून टाकण्याचा ती  प्रयत्न करते.वाईटावर चांगल्याचा आणि भक्तीचा विजय असतो.त्यामुळे वाईट प्रवृत्तीचा नाश करून म्हणजेच दहन करून हा सण साजरा केल्या जातो.

होलिका दहन पुजा विधी : 

होलिका दहनाची विधिवत पुजा असते,एरंडाचे वाळलेले झाड,वाळलेली लाकडे,कापुर ,काष्ठ ,चंदन ,गौऱ्या,हवन सामग्री इत्यादीची  वर्तुळ आकारात योग्य रचना करावी,त्या भोवती रांगोळी काढावी,प्रार्थना करावी मनोवंचित मनोकामना करावी ,संपुर्ण परिवाराने मिळुन पुजा करावी धुप,दीप,अगरबत्ती आणि पुरणाचा नैवैद्य दाखवावा,होळी मध्ये नारळ ठेवावा आणि त्याचे दहन करावे.

हा अग्नी म्हणजे एका प्रकारचा प्रतीकात्मक यज्ञच आहे.भक्तीभावाने होलिकाच्या अग्नीत टाकलेल्या समिधा देवतांना प्रसन्न करतात त्यातुन त्यांना उर्जा मिळते आणि अग्नी आणि अन्न देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.

अहंकार,भय,राग,लोभ,मत्सर,अज्ञान हे अग्नी सोबत भस्म करावे.आणि अग्नी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी ही राख संपूर्ण शरीरावर लावुन धुळवड साजरी केली जाते आणि दहनाच्या वेळी टाकलेला नारळ प्रसाद म्हणुन खाल्या जातो.रंगपंचमी आणि वसंत उत्सवात रंगाला विशेष महत्त्व असते.मनसोक्त रंगात भिजुन हा दिवस साजरा करण्यात येतो.रंग आणि उल्हासाचा पर्व म्हणजेच रंगोत्सव,धुळवड म्हणुन साजरी करतात.वृंदावन व मथुरे ची होळी फार प्रसिद्ध आहे.

असा हा रंगोत्सव आपल्या जीवनात सदैव ,आनंद,धन,सौख्य यांची पाठराखण करत राहो.आपल्या सर्व चिंता,काळज्या व दुख: होलिके मध्ये दहन करावे व निरामय आरोग्य लाभावे ह्याच सदिच्छांसह….

!!!!!!शुभम भवतु !!!!!!