दीपावली :पर्व प्रकाशाचे,उत्सव तेजाचे ,पुजन मांगल्याचे 

दीपावली हा जगातला अत्यंत प्राचीन सण असुन भारतीय परंपरेतील सणांचा राजा आहे. या सणाच्या नुसत्या उल्लेखाने रोम रोम हर्षित होते.कळत नकळत उत्साहाची शिरी-शिरी अंगात भिनुन जाते. या सणांच्या गोड आठवणींनी आणि स्मृतींनी अनेक जणांचे भावविश्व व्यापले आहे.असा हा सणांचा राजा मानवी जीवनात चैतन्य ,उत्साह ,आनंद  आणि प्रकाश घेऊन येतो.आपल्या पुर्वाचार्यांनी या सणाची मांडणी अत्यंत परिपुर्ण अशी केली आहे.

अश्विन कृष्ण त्रयोदशी पासुन तर कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत या सणाची व्याप्ती आहे.शरद ऋतुतील बोचरी थंडी आणि प्रसन्न वातावरणात उत्साह द्विगुणीत करण्यात हा सण येतो,तेव्हा लहान थोरांपासुन ते अबालवृद्धा पर्यंत सर्वांची धांदल उडते.

या सणाचा केंद्रबिंदु आहे प्रकाश , “||असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय ||” म्हणजेच अंधारातुन प्रकाशाकडे होणारी वाटचाल.मानवी जीवनात प्रकाशाला उजेडाला श्वासा इतकेच स्थान आहे.अशा या प्रकाशाचे प्रतिक म्हणजे दीप आणि दीपपुजन म्हणजेच दीपावली .नावही किती सार्थ आहे ,म्हणजे दिव्याची आरास लखलखाट.या सणामुळे झोपडीपासुन महाल दिव्यांच्या लखलखाटाने उजळुन निघतात.

अश्विन कृष्ण एकादशीपासुन सणांची मांदियाळी सुरु होते अश्विन एकादशी म्हणजे रमा एकादशी या दिवशी सायंकाळी दिव्यांची आरास करायला सुरवात होते या दिवशी पासुन दिवे लावतात.

अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस  ह्या दिवशी सुर्यास्ताच्या समयी संवत्स गाईचे पुजन करून तिच्या पायावर पाणी टाकुन अर्घ्य द्यावे गाईला उडदाच्या वड्याचा नैवैद्य द्यावा ,तिच्या पुजनाने पुण्य प्राप्त होते.

आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात त्या दिवशी सायंकाळी दक्षिण दिशेला कणकेचा दिवा लावाववा आणि यमदेवतेला नमस्कार करावा याला यम दीपदान असे म्हणतात यामुळे अपमृत्यु टळतो अशी श्रद्धा आहे.या दिवशी धन्वंतरीची आणि कुबेराची हि पुजा केली जाते.समृद्ध आरोग्य आणि धनसंपदा प्राप्त व्हावी हा या मागचा उद्देश असतो.

अश्विन कृष्ण चतुर्दशी यालाच नरक चतुर्दशी म्हणतात .पहाटे समयी अभ्यंगस्नान तीळ,तेल  आदीचा अभ्यंग करून स्नान करावे. शुचिर्भुत होऊन,दिव्यांची आरास आणि रोषणाई करावी.याच दिवशी नरकासुराचा वध झाला होता.

अश्विन कृष्ण अमावस्येला लक्ष्मीपुजन असुन, या दिवशी घरो घरी सायंकाळी श्री महालक्ष्मीची तसेच कुबेराची विधीवत पुजाअर्चा केली जाते .लक्ष्मी पुजानानंतर फटाके फोडण्याची परंपरा आहे.लक्ष्मी पुजनाचा या वर्षीचा मुहुर्त सायंकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत आहे.

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला  दिवाळी पाडवा असे म्हणतात.या दिवशी अभ्यंग स्नान करून बळी राजाची पुजा केली जाते,तसेच सौभाग्यवती स्त्रिया पतीला अभ्यंग स्नान घालुन ओवाळतात आणि त्यांना उत्तम आयुष्य लाभावे अशी याचना करतात.व्यापारी वर्ग या दिवशी वही पुजन किंवा खातेवहीचा शुभारंभ करतात.म्हणजे व्यापारी वर्गाचे आर्थिक वर्ष सुरु होते.या दिवशी साडेतीन मुहुर्तांपेकी एक मुहुर्त असुन या दिवशी नवीन शुभारंभ नवीन खरेदीसाठी विशेष महत्त्व असते.या दिवशीचा उत्तम मुहुर्त राहणार आहे सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि सायंकाळी ५ ते ९.

कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीय अथवा भाऊबीज असे म्हणतात.या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते तसेच दीर्घ आयुष्याची कामना करते भाऊ बहिणीला वस्त्र अलंकार आदीने सत्कार करतो.या दिवशी यमपुजनाचे आणि यमतर्पणाचे महत्त्व आहे.

असा हा प्रकाशाचा पर्व त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत चालतो त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुर वाती लावुन दीपोत्सव साजरा केल्या जातो.अशा प्रकारे सणांची मांदियाळी आणि सणांचे महत्त्व आहे.यावरून आपल्या संस्कृतीचा गाभा किती खोलवर रुजलेला आहे याची जाणीव आणि प्रचिती येते.

प्रकाशाच्या पुजनाने सुरु झालेला उत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला दैदीप्यमान होऊन संपतो तेव्हा विवाह समारंभाची लगबग सुरु झालेली असते मांगल्याची दिव्य अनुभुती प्रसन्नतेचे वातावरण संस्कारंचा ठेवा नात्याचं पावित्र्य याची घट्ट वीण हा सण रोवुन जातो.

जीवनात जसे प्रकाशाला महत्त्व आहे.तितकेच महत्त्व धनाला आणि अन्नाला आहे दिव्यांची आरास ,फराळची मेजवानी  आणि लक्ष्मीचे पुजन या त्रिपुटीची सुयोग्य मांडणी करून आपल्या पुर्वसुरींनी एक मोठा ठेवा आपल्याला दिला आहे.हा वारसा म्हणजे अंधारातुन प्रकाशाकडे, प्रकाशातुन दिव्यत्वाकडे घेऊन जाणारा हा प्रवास होय.अंधाराने खचुन जायचे नसते,आपल्या प्रकाश वाटा आपल्यालाच शोधाव्या लागतात.असे हे प्रकाश पर्व आपल्या जीवनात लखलखाट,भरभराट तसेच सुख-शांती-समृद्धी घेऊन यावा या सदिच्छांसह ………..

|||||||||| शुभम भवतु ||||||||||