डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य

शके १९४० विलंबी नामसंवत्सर दक्षिणायन कार्तिक कृष्ण पक्ष नवमीला डिसेंबर महीना आरंभ होत असुन कार्तिक कृष्ण पक्ष मार्गशीष शुक्ल पक्ष,मार्गशीष कृष्ण पक्ष अशा दोन मराठी महिन्यात डिसेंबर हा इंग्रजी महिना विभागला गेला आहे.

डिसेंबर महिन्याचे वैशिष्टय म्हणजे ६ डिसेंबरला पुर्व क्षितिजावर गुरु या ग्रहाचा उदय होत असुन ८ डिसेंबरला देव दिपावळी अर्थात मार्तंड भैरव पुजन आणि खंडोबाच्या यात्रेला आरंभ होत आहे.13 डिसेंबरला चंपाषष्टी असुन चंपाषष्टीला स्कंध षष्टी असेही म्हणतात.१९ डिसेंबरला भागवत एकादशी गीता जयंती असुन तसेच मार्गशीष शुक्ल पौर्णिमेला दत्तात्रय जयंती असुन गाणगापुर क्षेत्री दत्तजयंती महोत्सव सुरु आहे.२५ डिसेंबरला अंगारक चतुर्थी असुन प्रभु येशुख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे नाताळ हा सण आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये १६ डिसेंबरला रवी धनु राशीत प्रवेश करत असुन २३ डिसेंबरला मंगळ मीन राशीत प्रवेश करतो आहे.बुध हा ग्रह संपुर्ण महिना वृश्चिक राशीत असुन गुरु हि वृश्चिकात राहणार आहे.शुक्र तुळ राशीत असुन शनी धनु राशीत आहे राहु कर्के राशीत असुन केतु मकर राशीत भ्रमण करणार आहे.मेष राशीत हर्षल कुंभ राशीत नेपच्युन धनु राशीत प्लुटो राहणार आहे.

मेष :

ग्रहांची स्थिती : राशी मध्ये हर्षल चतुर्थामध्ये राहु,सप्तमामध्ये शुक्र,अष्टमामध्ये बुध-गुरु-रवी.१६ डिसेंबरला अष्टमामधुन रविचे भ्रमण भाग्यात असणारा शनी दशमात असलेला केतु लाभातला मंगळ  २३ डिसेंबरला लाभातुन व्येयात जाणारा मंगळ हि ग्रहदशा पाहता मेष राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महीना अस्वस्थतेत भर घालणारा उतार चढाव युक्त राहील याची नोंद घ्यावी.

आरोग्य : आरोग्याबाबतीत हा महिना मानसिक ताणतणावाला आमंत्रण देणारा राहील.कौटुंबिक सदस्यांच्या आणि स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहावे लागेल.तब्येतीच्या कुरबुरी उद्भवतील लहान-सहान व्याधींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अनारोग्य आणि ताणतणाव सुयोग्य पद्धतीने हाताळावा लागेल.चिंतेला आणि काळजीला दुर लोटावे लागेल.

आर्थिक : या बाबतीत संमिश्र स्वरूपाचे परिणाम अनुभवयास येतील.अनाठायी होणारा खर्च आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.आर्थिक प्रगतीचा वेग अस्थिर झाल्यामुळे मोठी खरेदी टाळणे हितवाह राहील.देण्याघेण्याचे व्यवहार जपुन करावेत किंबहुना टाळावेत.एखादे देणे डोईजड होईल.नुकसान भय असल्यामुळे वस्तु संभाळा.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत कष्टदायक आणि कसोटीचा महिना कामाच्या ठिकाणी सुप्त तणाव राहील.वरिष्ठांशी जुळवुन घेताना त्रास संभवतो आहे.प्रसंगी कामाच्या ठिकाणी हतबलता आणि छळवणकीला सामोरे जावे लागेल.संयम बाळगुन नौकरी टिकवावी घाई गर्दीत कुठलाही निर्णय घेऊ नये.

व्यवसायाबाबतीत हा महिना कष्ट करावयास लावणारा राहील आर्थिक दडपण आणि स्पर्धकांची भीती यामुळे मानसिक तणावात रहाल.उद्भवणाऱ्या आर्थिक समस्या उपलब्ध भांडवलातच भागवावी साहसाने घेतलेला व्यासायिक निर्णय अंगलट येण्याची शक्यता आहे.

कोर्ट कचेरी : या बाबतीत हा महिना उत्साहवर्धक असणार नाही.प्रलंबित प्रकरणे अजुनही रेंगाळतील मानसिक तणावाचे पडसाद कोर्ट प्रकरणामुळे संपुर्ण महिनाभर जाणवेल.वकील मंडळीकडुन सबुरीचा सल्ला हितवाह राहील.स्थावर बाबतीत ह्या महिन्यात फार अपेक्षा ठेवुन चालणार नाही.

वृषभ :

ग्रहांची स्थिती : तृतीय स्थानात राहुचे भ्रमण,षष्टात शुक्र,सप्तमामध्ये बुध-रवी-गुरु ,सप्तमातुन अष्टमात जाणारा रवी महिन्याच्या मध्याला अष्टमातला शनी भाग्यातला केतु आणि नेपच्युन दशमातला मंगळ २३ डिसेंबरला दशमातुन लाभात जाणारा मंगळ ही ग्रहस्थिती पाहता वृषभ च्या जातकांसाठी हा महिना काहीसा अनुकुल बरचसा प्रतिकुल जाणार असुन ताण तणावात काहीशी वाढ होईल.

आरोग्य : या बाबतीत हा महीना तक्रारीत वाढ करणारा राहिल.तब्येतीसंबंधी झालेला त्रास योग्य निदानापर्यंत घेऊन जाईल वेळेत औषधउपचार लागु होईल.जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.प्रसंगी निष्णात वेद्यकीय तज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल.

आर्थिक : अर्थ प्राप्तीत हा महिना अनुकुल असल्यामुळे आर्थिक दडपण बऱ्यापेकी कमी होईल.प्रयत्नांची मात्र वाढविल्यामुळे आर्थिक प्रगती उत्तम राहील.अर्थकारणाचे बदलते स्वरूप घेतलेल्या निर्णयावर अवलंबुन राहील.कर्जमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत नवीन आव्हान आणि स्पर्धेला तोंड देणे क्रमप्राप्त राहील.वरीष्ठांसोबत वादाची शक्यता टाळावी.नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे कामाचा ओघ प्रचंड राहील.उदासीनता आळस झटकुन कामाला लागावे लागेल.

व्यवसाया मध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्यामुळे धावपळ उडेल आलेल्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात राहील.भरपुर मेहनत अपार कष्ट आणि मनुष्य बळाची सुयोग्य हाताळणी यातुन उत्पन्नवाढीचा आकडा गाठता येईल.

कोर्ट कचेरी : चालु असलेल्या खटल्याबाबत अजुन ही विलंब राहील.दिरंगाईमुळे जर कोर्टाबाहेर तडजोड करण्याचा प्रस्ताव आल्यावर होकार द्यावा.स्थावर मालमत्ता बाबतीत  खटले प्रगती पथावर येतील.

मिथुन

ग्रहांची स्थिती : धन स्थानातुन राहु,षष्टामध्ये बुध-गुरु-रवी  महिन्याच्या मध्याला षष्टातुन सप्तमात जाणारा रवी,सप्तमात असणारा शनी,अष्टमातील केतु ,भाग्यातला मंगळ २३ डिसेंबरला भाग्यातुन दशमात जाणारा मंगळ ही ग्रहदशा पाहता मिथुन राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना प्रयत्नांती यश देणारा आणि भरपुर मेहनत करून घेणारा महिना राहील.आरोग्याचे प्रश्न बिकट होतील.

आरोग्य : या महिन्यात तब्येतीला विशेष महत्त्व द्यावे लागेल. वाढवणारा वैद्यकीय खर्चाचा नियोजन केल्यास आर्थिक ओढताण होणार नाही.एखादी लहान मोठी व्याधी प्रसंगी मोठे रूप धारण करू शकते.अस्वस्थ  करणारी काही लक्षण आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेतल्यास योग्य राहिल.मानसिक तणावाचे सुनियोजन केल्यास उत्तम राहिल.

आर्थिक : आर्थिक आघाडीवर हा महीना संचित करणारा राहील. ‘आ’ वासुन उभे राहिलेले खर्च निपटताना नाकीनऊ येतील.खर्चाचा वाढता आलेख नको ते साहस करावयास लावु शकतो.जोखिम पत्करू नये.गरजांवर आणि खर्चांवर नियंत्रण हाच एक उपाय सक्षम राहील.उत्पन्न वाढीसाठीचे विशेष प्रयत्न अनिवार्य राहतील.सभोवतालच्या मंदीच्या झळा जाणवु लागतील.आर्थिक दक्षता आणि सुनियोजन याशिवाय पर्याय राहणार नाही.

नौकरी व्यवसाय : नौकरी मध्ये चांगले वातावरण निर्माण करणाऱ्या घटना घडतील कामाचा हुरूप वाढेल एकीकडे काम वाढेल,तर दुसरीकडे विरोधही तेवढाच राहील.यामुळे चांगल्या कामाचे श्रेय मिळणार नाही.समस्यातुन वाटचाल काढत पुढे जाण्याचे संकेत महीना देत आहे.

व्यवसायातील मंदी ठळकपणे जाणवेल.भांडवलाची पुर्तता करताना अडथळे येतील.मनुष्यबळामुळे त्रास राहील.अपुऱ्या मनुष्य बळामुळे कामे थांबतील.आहे त्या गोष्टीत समाधान मानावे लागेल.मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती राहील.

कर्क

ग्रहांची स्थिती : राशी मध्ये राहुचे भ्रमण,चतुर्थामध्ये शुक्र,पंचमामध्ये रवी-बुध-गुरु पंचमातुन महिन्याच्या मध्याला षष्टा मध्ये जाणारा रवी षष्टात असलेला शनी,सप्तमातला केतु ,अष्टमात जाणारा रवी षष्टात असलेला शनी ,सप्तमातला केतु ,अष्टमातला मंगळ २३ डिसेंबर ला अष्टमातुन भाग्यात जाणारा मंगळ दशम स्थानी हर्षल हि ग्रहस्थिती पाहता कर्क राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना ताण तणाव युक्त आणि संघर्षामयी तसेच आरोग्याचे प्रश्न बिकट करणारा आहे.

आरोग्य : या बाबतीत उत्तरार्धात प्रकृतीच्या तक्ररी वाढविणारा राहील जुनाट व्याधींचे योग्य निराकरण झाल्याने उपचार पद्धती प्रभावीपणे लागु होईल.सांधेदुखी आणि पाठीचा त्रास संभवतो आहे वाहन चालवताना विशेष दक्षता घ्यावी.कौटुंबिक सदस्यांचे आरोग्य मात्र चांगले राहील.

आर्थिक : अर्थकारणाची गती वाढविणारा आणि उत्साहवर्धक राहील.मागील काळापासुन सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे प्रगतीचा आलेख बऱ्यापैकी चढता राहील.निर्णयाची समतोलता आणि दुरदृष्टी ठेवुन घेतलेले निर्णय भविष्यकाळातील प्रगतीसाठी दिशा देतील.अनाठायी खर्चाला निश्चितपणे आवर घालावा.काही निर्णय अंगलट येतील.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना अनुकुल असल्यामुळे मनासारखे बदल होतील.कामाचा हुरूप राहील.आपल्या कामाने वरिष्ठ खुश झाल्याने वातावरण प्रसन्न राहील.सहकारी आणि हितशत्रुंचा त्रास मोडुन काढावा लागेल.नवीन नौकरीची संधी उपलब्ध होईल.

व्यवसाय विस्तारासाठी महिना अनुकुल असल्याने अनेक नवीन योजनांची महुर्तमेढ करता येईल.योग्य त्या वेळेस हाती भांडवल आल्यामुळे नवीन कामांना गती येईल.मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांची उत्तम सांगड जमेल.एकंदरीतच हा महिना दिलासादायक राहील.

कोर्ट कचेरी : या प्रकरणात ह्या महिन्यात बऱ्याच घडामोडी घडतील.प्रलंबित प्रकरणे आता निर्णायक वळणावर येतील.वकील मंडळींचा उत्साह चैतन्यदायक राहील.नवे मार्ग सापडतील.तडजोड केल्यामुळे आनंददायक स्थिती निर्माण होईल.

सिंह :

ग्रहांची स्थिती : तृतीय स्थानात शुक्र चतुर्थात रवी-बुध-गुरु १६ डिसेंबरला चतुर्थातुन पंचमात जाणारा रवी पंचमात असलेला शनी षष्टातला केतु सप्तमातला मंगळ २३ डिसेंबरला सप्तमातुन अष्टमात जाणारा मंगळ भाग्यात जाणारा हर्षल व्येयातला राहु  ही ग्रहस्थिती पाहता डिसेंबर महिना सिंह राशीच्या जातकांसाठी समाधानकारक तसेच खर्च वाढविणारा धावपळ दगदगीचा राहील.

आरोग्य : शारिरीक आरोग्यापेक्षा मानसिक व भावनिक आरोग्याचे तणावाचे नियोजन करणे गरजेचे राहील.शारिरीक आरोग्यात सुधारणा अपेक्षित असली तरी मानसिक चिंता आणि ताण तणावामुळे बरे वाटणार नाही.संततीच्या आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.वाहनांपासुन महिन्याच्या मध्याला त्रास संभवतो.वाढीव दक्षता घ्यावी.

आर्थिक : अर्थकारण आता गती घेईल.कर्जाचा वाढता डोंगर आणि परतफेडीची चिंता यावर मार्ग सापडेल मनाची संभ्रम अवस्था आणि आर्थिक तणाव सुयोग्य पद्धतीने हाताळल्यास काही चांगली फळे अनुभवयास येतील.महत्त्वाचे करार मदार आणि व्यवहार जपुन हाताळावे थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आर्थिक पाठबळ प्राप्त होईल.आर्थिक व्यवहार हाताळताना अष्टावधानी राहाण संयुक्तिक  राहील.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना अनुकुल जरी नसला तरी प्रतिकुल नाही. हळुहळु कामाची दखल घेतल्या जाईल.प्रगतीची महुर्तमेढ रोवल्या जातील.एखादे चांगले काम वरिष्ठांची मर्जी मिळवुन देईल.आगामी वर्षातील ठोकताळे आखुन देण्यास हा महिना कारणीभुत राहील.नवीन संधीपेक्षा हि ती टिकवण हितकारक राहील.

व्यवसाया बाबतीत उर्जा पुरविणारा हा महिना राहील व्यवसाया बाबतीत मोठी गुंतवणुक जोखीम टाळावी.भागीदाराशी संबंधित व्यवसायात दक्षता बाळगावी.स्पर्धेचा विचार न करता प्रामाणिक कष्ट आणि गुणवत्ता याला महत्त्व दिल्यास आगामी कळत त्याची फळ अनुभवयास येतील.

कोर्ट कचेरी : या बाबतीत या महिन्यात दडपण कायम राहील.विनाकारण वकिलांचा दबाव अनुभवयास येईल.सोबतीची मंडळी विचित्र वागतील,वकिलांशी वाद घालु नका.स्थावर मालमत्ता प्रकारणे मार्गी जरी लागेल.तरी अजुन प्रत्यक्ष लाभ मिळाल्यास उशीर होईल.

कन्या :

ग्रहांची स्थिती : धनस्थाना मध्ये शुक्राचे भ्रमण तृतीय स्थानात रवी-बुध-गुरु  १६ डिसेंबर ला तृतीयातून चतुर्थात जाणारा रवी आणि तिथे असलेला शनी पंचमामध्ये केतु-नेपच्युन षष्टात मंगळ आणि २३ डिसेंबरला षष्टातुन सप्तमात जाणारा मंगळ अष्टमातला हर्षल लाभातला राहू हि ग्रहदशा पाहता कन्या राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महीना आत्मविश्वास वाढविणारा तसेच आर्थिक बाबतीत भरीव लाभ देणारा राहील.

आरोग्य : आरोग्याबाबतीत हा महिना काळजी घेण्याचे संकेत देत आहे.वारंवार उद्भवणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी दैनंदिन दिनचक्रामध्ये अडथळे आणते.अनुत्साह आणि अंगदुखीला सामोरे जावे लागेल.तब्येतीची पुरेपुर काळजी घ्यावी लागेल आणि आहार-विहार नियंत्रण आणि व्यायामला महत्त्व द्यावे.

आर्थिक : हा महिना आर्थिक स्थितीत स्थित्यंतर घडवणारा राहील.भविष्यातील आर्थिक स्थितीचा आत्ताच आढावा घेतला तर संभाव्य आर्थिक प्रवास स्थिरतेकडे जाईल,खर्चावर नियंत्रण,अनावश्यक खर्च टाळणे गरजेपुरताच व्यवहार करणे हे धोरण ठेवल्यास हा महिना आर्थिक समस्यामुक्त राहील.महत्त्वाची खरेदी अथवा स्थावर खरेदी,कर्ज पुढे ढकलावे.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना प्रतिकुल राहील.कामाचा आवक वाढल्यामुळे दडपण जाणवण्यास सुरवात होईल.कामाचा निपटारा करताना नाकी नऊ येतील.वाढीव कामाचा ताण शरीर आणि मन दोघांवर पडेल.असलेली नौकरी टिकवण म्हत्त्वाच राहील.

व्यवसाया बाबतीत हा महिना नवीन जबाबदाऱ्या आणि आव्हान घेऊन येत आहे.आगामी काळाचे नियोजन करून वाटचाल करावी लागेल.आर्थिक प्रकरण सुयोग्य पद्धतीने हाताळल्यास दडपण येणार नाही.कामांचा नियोजन आणि हाताळणी कामामध्ये दिरंगाई अथवा कसुर होता कामा नये.मनुष्यबळाचा सुयोग्य वापर आणि हाताळणी करावी लागते.

कोर्ट कचेरी : कोर्टा बाहेर जर काही होत असेल तर कोर्टाची पायरी न चढलेली बरी.वादग्रस्त प्रकरण मार्गी लागेल.यश मिळेल स्थावर मालमत्ता अथवा घटस्फोट संबंधी प्रकरण त्रास होईल.आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल.

तुळ :

ग्रहांची स्थिती : राशीत शुक्राचे भ्रमण,धन स्थानात रवी-बुध-गुरु धन स्थानातुन तृतीय स्थानात जाणारा रवी आणि तृतीय स्थानात असणारा शनी चतुर्थात केतु ,पंचमात असणारा मंगळ पंचमातुन षष्टात जाणारा मंगळ सप्तमातला हर्षल दशमातला राहु ही ग्रहस्थिती पाहता तुळ राशीच्या जातकांसाठी हा महीना काहीतरी हरवलेलं आणि काहीतरी गवसणारा राहील.जे हरवलंय त्याच दुख आणि जे गवसलाय त्याच सुख अशा सुख दुखांच्या संमिश्र भावने मध्ये हा महिना असेल.

आरोग्य : या संबंधित समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे तणावाचे नियंत्रण करणे श्रेयस्कर राहील.जुनाट व्याधी उपचारामुळे बरी होण्यास मदत होईल.तब्येतीतील सुधारणा मानसिकतेच्या बळावर उभी राहील.कौटुंबिक सदस्यांचे आरोग्य सुदृढ राहील.

आर्थिक : या बाबतीत अप्रतिम फळ देणारा हा महिना राहील.प्राप्तीत झालेली वाढ हाती आलेला पैसा मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास वाढेल.व्यवसायामधले निर्णय लाभदायक ठरल्यामुळे मोठे व्यवहार मार्गी लागतील एखादे कर्ज प्रकरण संपुष्टात येईल.आर्थिक मदतीचा ओघ निर्माण झाल्यामुळे भावी काळासाठी आर्थिक नियोजन करता येईल.

नौकरी व्यवसाय : नौकरी मध्ये चांगल्या घडामोडी घडविणारा हा महिना राहील.ज्या संधीची दीर्घकाळ वाट पाहणे चालु होते ती संधी दृष्टीक्षेपात आल्यासारखे वाटेल.कामाच्या स्वरुपात काही चांगले बदल आणि वेगवान घडामोडी घडल्यामुळे धावपळ करावी लागेल.नवीन कामाची जबाबदारी आणि उत्साह वाढविणारा हा महीना राहील.

व्यवसाया बाबतीत ग्रहांची अनुकुल स्थिती लाभल्यामुळे व्यवसायाचे चित्र पालटायला सुरवात होईल.आर्थिक येणी वसुल झाल्यामुळे हातात खेळते भांडवल राहील.व्यवसायातील विस्तारीकरणाच्या योजना हाताळण्यासाठी काळ योग्य राहील.

कोर्ट कचेरी : दिर्घकाळा पासुन सुरु असलेले कायदेशीर प्रकरणाने आता गती घेतील व बऱ्यापैकी निर्णायक अवस्थेवर येतील.यशाची चाहुल लागेल.वकिल मंडळींच्या मागे लागुन गोष्टी पदरात पाडुन घ्याव्यात.कायदेशीर बाबींची पुर्तता करताना आर्थिक भार सोसावा लागेल.कौटुंबिक वादात आता मार्ग दिसेल मनस्ताप कमी होण्यास सुरवात होईल.

वृश्चिक :

ग्रहांची स्थिती : राशीत रवी-बुध-गुरु ,धनस्थानातला शनी राशीतुन धनात जाणारा रवी तृतीयातला केतु,चतुर्थातला मंगळ २३ डिसेंबर नंतर पंचमात जाईल.षष्टातला हर्षल भाग्यातला राहु व्येयात असणारा शुक्र ही ग्रहस्थिती पाहता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आर्थिक दृष्ट्या तणावाचा राहील तसेच मनस्तापयुक्त आणि तारांबळ उडवणारा राहील.

आरोग्य : हा महिना आरोग्याची समस्या वाढविणारा राहील.रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे व्याधी बळावतील घरातील आजारपणासाठी खर्च करावा लागेल.आरोग्याची घडी नीट ठेवायची असेल तर आहार आणि व्यायाम याचे नियम पाळावे लागतील रक्त दाबातील अथवा स्नायुबद्दल विशेष काळजी घ्यावी.

आर्थिक : या बाबतीत ह्या महिन्याचे ग्रहमान प्रतिकुल आहे.आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी लागेल.उत्पन्नाचा घसरता आलेख आणि वाढलेला खर्च यांचा ताळमेळ साधताना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागेल.थकलेली देणी आणि आर्थिक अस्थिरता यामुळे मन विचलित होईल.अस्थिर मनोवृत्तीमुळे घेतलेला निर्णय भविष्यात आर्थिक फटका देऊ शकतो आहे.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना कामाचा वाढता ताण घेऊन येत आहे.कामाचा पसारा वाढल्यामुळे गोंधळ उडेल.केलेल्या कामांचे चीज न झाल्यामुळे निराशा दाटुन येईल.सहकारी आणि वरिष्ठ यांच्या वागण्यामुळे दुखावले जाल.बाकी गोष्टींचा विचार न करता कामावर लक्ष केंद्रित कराव.नवीन नौकरी मिळण्याबाबत नकारत्मकता राहील.चालु नौकरीला प्राधान्य द्यावे.

खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल तुर्तास नवीन योजना गुंडाळुन ठेवावी लागेल.विशेष करून आर्थिक बाजु खुप जपुन हाताळावी लागेल कुठल्याच गोष्टीला अडकुन न पडता पुढे जात राहणे हे धोरण ह्या महिन्यात ठेवाव.भरपुर कष्ट,अपार मेहनत आणि उत्तम मनोबळ हे धोरण ह्या महिन्यात तारणार राहील.

कोर्ट कचेरी : हा महिना फारसा अनुकुल राहणार नाही.काही गोष्टी पुढे ढकलने योग्य राहील.कायदेशीर प्रक्रीया मनस्ताप देणारी राहील.आर्थिक फटका बसेल तो वेगळ्याच.योग्य सल्ल्या अभावी प्रकरण लांबतील.कोर्टाची पायरी न चढलेली बरी.

धनु

ग्रहांची स्थिती : राशीत असणारा शनी महिन्याच्या मध्याला राशीत येणारा रवी धनस्थानात असलेला केतु,तृतीयेताला मंगळ २३ डिसेंबर नंतर चतुर्थात जाईल.पंचमात असलेला हर्षल अष्टमातला राहु,लाभातला शुक्र ,व्येयातला रवी-बुध-गुरु ही ग्रहदशा पाहता धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना तीव्र कष्टदायक आणि काहीसा हिरमोड करणारा असु शकतो आहे.अविरत प्रयत्न करावे लागतील.

आरोग्य : अचानक तब्येतीच्या कुरबुरी सुरु झाल्यामुळे मनाचा गोंधळ उडेल.गांगरून न जाता वेद्यकीय चिकित्सा,सुयोग्य आहार,काटेकोर व्यायाम ,फिरणे या कडे विशेष लक्ष द्यावे.भरपुर झोप घेण्याचा प्रयत्न करावा झोपेचे तंत्र बिघडल्यामुळे समस्या उद्भवु शकतात जास्त ताण घेऊ नये.

आर्थिक : या बाबतीत हा महिना अस्थिर आणि खर्चिक राहील.प्रयत्नाशिवाय पर्याय नाही.जमा खर्चाचा ताळमेळ साधुन देणी आणि इतर खर्च भागवावा लागेल आर्थिक संकटाला निमंत्रण मिळेल असे कुठलेही कार्य करू नये.एकंदरीत आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम करणारा हा महिना राहिल.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना कामाचे दडपण वाढविणारा राहील.ह्या महिन्यात कामात स्वतःला झोकुन द्यावे लागेल.बाकी गोष्टींची अपेक्षा ठेवुन चालणार नाही.परिस्थितीशी जुळवुन घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही.नवीन नौकरी अथवा बदल तुर्तास नको.धीर,श्रद्धा,सबुरी ठेवा.

व्यवसायात अथक परिश्रम केल्यानंतरही फळ अर्धेच मिळेल.फार अपेक्षा ठेवुन चालणार नाही.आर्थिक बाजु कमकुवत असल्यामुळे त्याचा परिणाम सगळ्या गोष्टींवर झाल्या शिवाय राहणार नाही.हातातले काम अगोदर संपवावे.नवीन कामांची घाई सध्या करू नये.आर्थिक बाजु योग्य पद्धतीने हाताळावी.भागीदारीत वाद टाळावेत.

कोर्ट कचेरी : हा महिना दडपण देणारा राहील.कायदेशीर बाबी नाव वळण घेतील.मनाविरुद्ध घटना घडतील.अचानकपणे अनुकुल गोष्टी विरोधात जातात कि काय अशी परिस्थिती समोर उभी राहील घाबरू नका संयम बाळगा गोष्टी पुढे ढकला.आर्थिक हानी टाळा.

मकर

ग्रहांची स्थिती : राशी मध्ये केतुचे भ्रमण धन स्थानातुन २३ डिसेंबर नंतर तृतीय स्थानात जाईल, चतुर्थात हर्षल लाभात रवी-बुध-गुरु,सप्तमात राहु दशमामध्ये शुक्र,व्येयामध्ये शनी १६ डिसेंबर नंतर लाभातुन व्येयात जाणारा रवी ही ग्रहदशा पाहता मकर राशीच्या जातकांसाठी ग्रहांची अनुकुलता परिणामकारक राहील आर्थिक प्रगती आणि इतर लाभ अपेक्षित राहतील.

आरोग्य : हा महिना किरकोळ तब्येतीच्या तक्रारींनी युक्त असेल दुखण्याचे योग्य निदान न झाल्यामुळे मन आरोग्याबाबतीत भयग्रस्त राहील.मात्र योग्य औषध उपचार उपलब्ध होऊन ह्याची मात्राही लागु पडेल.आरोग्य सुधारेल.

आर्थिक : हा महिना आर्थिक सबलीकरणाचा आणि बळकटीचा राहील.सुखद आर्थिक लाभ होतील.वेगवेगळ्या माध्यमातुन भांडवलाची योजना झाल्यामुळे नवीन योजना कार्यान्वीत होईल नवीन संधीचे सोने करणे तुमच्या हातात राहील.नवीन कर्ज प्रकाराने मार्गी लागतील.परंतु साडेसातीचा विचार करता आर्थिक व्यवहार जपुन करावा.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत कामाच्या ठिकाणी अचानकपणे काही सकारात्मक बदल होतील.प्रतीक्षेत असलेली संधी चालुन येईल.उत्साह व चेतन्य लाभल्यामुळे कामाचा हुरूप येईल केलेल्या कामाचे कौतुक होईल.मान सन्मान प्राप्त होईल.बढतीचे योग राहतील.नवीन नौकारीचे कागदपत्र हाती येतील.

व्यवसाया बाबतीत हा महिना खुपच उंची पुरविणारा राहील.चांगले ग्रहमान लाभल्यामुळे नवीन योजना राबविताना प्रचंड उत्साह सळसळेल आर्थिक प्राप्ती मनासारखी झाल्यामुळे नवीन योजना सहज आखता येतील.जास्त हुरळुन न जाता पाय जमिनीवर ठेवुन वाटचाल करावी.साडेसाती चालु आहे याचे भान ठेवावे.मेहनत लाभ देणारच आहे.नवीन योजना आखताना विशेष काळजी घ्यावी.कर्ज फेडीसाठी प्रभावी धोरण राबविल्यास कर्जमुक्त होता येईल.

कोर्ट कचेरी : हा महिना तडजोडीनी उपयुक्त राहील.नवीन प्रकरण सध्या टाळावे.जुन्या खटल्यांन बाबतीत गोष्टी पुढे सरकतील.मात्र धाकधुक आणि तणाव कायम राहील.वकील मंडळींचा सल्ला प्रत्यक्षात आणावा.

कुंभ

ग्रहांची स्थिती : तृतीयात असणारा हर्षल,षष्टातला राहु,भाग्यातला शुक्र दशमातला रवी-बुध-गुरु दशमातुन लाभत जाणारा रवी महिन्याच्या मध्यानंतर आणि लाभत असणारा शनी राशीत असणारा मंगळ २३ डिसेंबर नंतर धन स्थानात जाईल व्येयातला केतु ही ग्रहदशा पाहता कुंभ जातकांसाठी हा महिना जबाबदाऱ्यात आणि कर्तव्यात वाढ करणारा राहील जास्त श्रम जास्त लाभ यांची अनुभुती येईल.

आरोग्य : हा महिना आरोग्या बाबतीत अनुकुल राहील आरोग्याबाबतीत अनुकुल राहील.आरोग्या बाबतीत फार मोठी समस्या उद्भवणार नाही.ताण-तणावावर योग्य नियंत्रण मिळविल्यास आत्मविश्वास दुणावेल भरपुर व्यायाम आणि पथ्य पाळल्यास शरीरयष्टीचे सबलीकरण सहज साध्य होईल.

आर्थिक : अर्थकारणात तेजी आणणारा असा महीना राहील.अर्थात खर्चही वाढतील पण येणाऱ्या पैशाचा ओघही वाढलेला असेल.खर्चा साठी पेसा उपलब्धही राहील विनासाये खर्च टाळावे.ह्या महिन्यातील आर्थिक जबाबदारी पार पाडताना विशेष काळजी घ्यावी.एखादा निर्णय अंगलट येईल खर्चापेक्षा बचतीवर जास्त भर द्यावा.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत हा महिना कामाचा दरारा वाढविणारा राहील.वाढलेले काम आणि कार्यालयीन दबावामुळे मन निरुत्साही राहील.मानसिक थकवा आणि गळुन गेल्यासारखे वाटेल.परिस्थितीशी जुळवुन घ्याव लागेल हे उत्तम.दक्षता,गोपनीयता आणि स्वावलंबन हे धोरण ह्या महिन्यात राबवावे लागेल.

व्यवसाया बाबतीत हा महिना नवीन काम देणारा जरी असला तरी जुनी काम पूर्ण होईपर्यंत असते कदम धोरण राबवावे.वेळापत्रक कोलमडल्यामुळे तणाव येईल

कोर्ट कचेरी : हा महिना खुपच दिलासादायक राहील.आता निर्णय लाभदायक राहतील.स्थावर मालमत्तेची प्रकरण मार्गी लागुन हाती लाभ येतील.वकिल मंडळींचे  देणे द्यावे लागेल.आर्थिक नियोजन करावे.

मीन

ग्रहांची स्थिती : धन स्थानातला हर्षल चतुर्थात असलेला राहु,अष्टमातला  शुक्र ,भाग्यातला गुरु ,दशम स्थानातला शनी ,भाग्य स्थानातला रवी-बुध-गुरु आणि महिन्याच्या मध्याला भाग्यातुन दशमात जाणारा रवी दशमात असणारा शनी ,लाभातला केतु,व्येयातला मंगळ २३ डिसेंबरला व्येयातुन राशीत जाणारा मंगळ ही ग्रहदशा पाहता मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना प्रतीकुलतेचे आणि अनुकुलतेचे पारडे जड करणारा राहील अध्यात्मिक प्रगतीकडे कल राहील.

आरोग्य : हा महिना निरामय आरोग्य घेऊन येत आहे.दीर्घ काळापासुन असलेली व्याधी आटोक्यात आलेली असेल.मानसिक स्वास्थ्य ही पुरेपुर राहील कौटुंबिक सदस्यांच्या ताब्येतीही सुदृढ राहतील.

आर्थिक : या जातकांचे आर्थिक ताळेबंद प्रतिकुलतेकडे झुकणारा राहील.झालेले आर्थिक लाभ टिकवताना तारंबळ उडेल.खर्चावर नियंत्रण न मिळवल्यास कर्जाचा डोंगर उभा राहील.या महिन्यात आर्थिक समस्यातुन मुक्त होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतील.आर्थिक स्थिती हाताळताना एखादा साहसी निर्णय अंगलट येण्याची चिन्हे राहतील.जोखिम तपासुन व्यवहार करावा.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत अनुकुल आणि प्रतिकुलता या हिंदोळ्यावर हा महिना पार करावा लागेल.कामाच्या ठिकाणी वातावरणात झालेला बदल तेवढा उत्साहवर्धक राहणार नाही.उसने अवसान आणुन हा महिना पुढे ढकलावा लागेल.ठरविलेले नियोजन पार न पडल्यामुळे निराशा जाणवेल.नवीन नौकरीच्या शोधात असणाऱ्यानी प्रयत्न वाढविणे गरजेचे राहील.हाती फारसे काही न लागल्यामुळे निराश होता कामा नये.

व्यवसाया बाबतीत घसरलेली व्यवसायाची गाडी रुळावर येण्यास वेळ असल्यामुळे हा महिना महत्त्वाचा राहील.ह्या महिन्यात नियोजन आणि आर्थिक कपातीच्या धोरणावर भर द्यावा लागेल.आर्थिक येणी वसुल करावी लागतील.संपुर्ण महिना वसुलीसाठी ठेवावा.भावी योजना मनातच राहतील.आर्थिक काटकसर नाईलाजाने  का होईना करावीच लागेल.स्पर्धकांशी इर्षा न करता आपले ईप्सित साध्य करायचा आहे.

कोर्ट कचेरी : कायदेशीर बाबतीत हा महिना अतिशय प्रतिकुल राहील.आर्थिक हानी मुळे मनाची घालेमल घेईल.बहुतेक करून ह्या महिन्यात वकिलाशी वाद होतील.प्रकरण वकील बदली पर्यंत जाईल.शक्यतो कोर्टाची पायरी चढु नये.

!!!!! शुभम भवतु !!!!!