|| सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य ||

सप्टेंबर महिन्याची ग्रहदशा पुढीलप्रमाणे राहील :-

१ सप्टेंबरला शुक्र तुळ राशीत प्रवेश करतो आहे,२ सप्टेंबरला बुध सिंह राशीत प्रवेश करतो आहे,१७ सप्टेंबरला रवी कन्या राशीत भ्रमण करेल,१८ सप्टेंबरला बुध कन्या राशीत जातो आहे,वक्री असलेला शनी ६ सप्टेंबरला मार्गस्थ होत आहे.२२ सप्टेंबरला होणारी मंगळ केतु युती बऱ्याच उलथापालथी घडवुन आणण्यास सज्ज होत आहे.

मेष:-

ग्रहांची स्थिती:– १ सप्टेंबरला सप्तमात येणारा शुक्र,गुरु बरोबर महिनाभर मार्गक्रमण करणार आहे.तसेच २ सप्टेंबरला पंचमातला बुध,१७ सप्टेंबरला षष्टातला रवी,१८ सप्टेंबरला कन्येतला बुध हे ग्रहयोग पाहता मेष जातकांसाठी सप्टेंबर महिना संमिश्र फळ देणारा राहील.

आरोग्य:- या बाबतीत हा महिना किरकोळ तक्रारींनी युक्त राहील,ऋतुचक्रानुसार हवामानात होणारे बदल आरोग्यावर परिणाम करतील.तब्येतीच्या कुरबुरी चालुच राहतील, सर्दी-खोकला पडसे आणि कफ याचे प्रमाण वाढेल,मात्र काळजी करण्यासारखे कारण नाही. वेळेवर निदान आणि औषधउपचारामुळे आराम मिळेल.२२ सप्टेंबरला होणारी मंगळ-केतु युती मानसिक तणाव आणि पायासंबंधी दुखणी निर्माण करतील.घरातील वडिलधाऱ्या मंडळींची विशेष काळजी घ्यावी.

आर्थिक:- या बाबतीत हा महिना जरी फारशी चिंता करायवयास लावणारा नसला तरी, आर्थिक निर्णय घेताना मात्र काळजी घ्यावी लागणार आहे.चुकीच्या निर्णयाचा एक मोठा फटका,२२ तारखेच्याच्या आसपास बसु शकतो आहे.

नौकरी व्यवसाय:- या बाबतीत महिना फार उत्साही नसला तरी एक लय टिकवुन ठेवावा लागेल,मात्र दशमात होणारी मंगळ-केतु युती एखाद अनामिक संकट उत्पन्न करेल, नौकारदार व्यक्तींनी नौकरीच्या ठिकाणी गोपनीयता बाळगावी हे उत्तम.वाढलेले कामाचे दडपण,ताणतणावचे नियोजन करावे लागेल.हितशत्रुंच्या कारवयांपासुन दक्षता बाळगावी.

व्यवसायाबाबतीत नवीन करार-मदार आणि ओळखीला चालना देणारा हा महिना राहील, भांडवलाची चिंता मार्गी लागल्यामुळे किंवा एखादे कर्ज प्रकरण हातावेगळे झाल्यामुळे खुप दिलासा मिळेल.महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी आर्थिक निर्णय जपुन घ्यावेत.  

कोर्ट कचेरी:- या बाबतीत हा महिना जरी दिलासादायक नसला तरी, कामांना गती देणारा राहील,स्थावर मालमत्तेचे खटले ऐरणीवर येतील,वकील मंडळींची धावपळ वाढेल.उत्तरार्धात महत्वाचा निकाल हाती येता येता मानसिक चिंता वाढेल,एकंदरीतच खटल्यांबाबतीत हा महिना तणावपुर्ण राहील.

नातेसंबध:- या बाबतीत हा महिना गुरु शुक्राच्या शुभ भ्रमणामुळे आनंदाची पाखरण करणारा राहील,या आनंदामुळे दशमात होणारी मंगळ-केतु युती,२२ तारखेनंतर विरजण पडणारी राहील, नातेसंबंधातील सुधारणा करण्यास वाव राहील,जोडीदाराशी काही महत्त्वपुर्ण विषयावर सल्लामसलत होईल,दोघांनी एकमेकांना विश्वासात घेतल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.

विद्यार्थी:- विद्यार्थी वर्गाला बुधादित्य योगामुळे हा महिना ज्ञान संपन्नता देणारा राहील,मागील महिन्यात सुरु झालेल्या अभ्यासक्रमाची गाडी हळु हळु रुळावर येईल पालक वर्गाची चिंता मिटेल.

वृषभ:-

ग्रहांची स्थिती:- महिन्याच्या सुरवातीला षष्टात येणारा शुक्र-गुरु सोबत महिनाभर मुक्कामी राहील, तर २ तारखेला चतुर्थातात येणारा बुध तर, सुरवातील चतुर्थातातुन होणारे रविचे भ्रमण १७ सप्टेंबर नंतर पंचमात जाईल अष्टमात असणारा शनी मार्गी होईल.भाग्यस्थानात होणारी मंगळ-केतु युती ह्या सगळ्या ग्रहमानामुळे हा महिना आव्हानात्मक आणि प्रतिकुल फलित देणारा असु शकतो आहे.

आरोग्य:-  या महिन्यात सुरवातीला वक्री शनी भ्रमणामुळे आरोग्या बाबतीत काही उतार-चढाव जाणवुन देणारे राहील,एक अनामिक दडपण राहील,तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल, हयगय करून चालणार नाही, मानसिक ताण-तणावामुळे झोपेचे ताळतंत्र बिघडेल थोडक्यात  आत्मबळ वाढवावे लागेल.

आर्थिक :- या बाबतीत मागील काही काळापासुन लागलेलं शुक्लाष्टक अजुनही दुर होण्यास विलंब लागणार आहे.वर्षभरातील आर्थिक खडतरता तीव्र होईल जमा-खर्चाची मांडणी करताना   डोळ्यासमोर काजवे चमकतील पैशाची गरज आणि सगळीकडुन येणारा नकार यामुळे  ताणतणाव जाणवेल.सगळीकडुन आर्थिक फसगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनाठायी खर्च करू नये ही सुचना.

नौकरी व्यवसाय :- या बाबतीत संपुर्ण महिनाभर कामाचा प्रचंड ताण जाणवेल, कठोर मेहनतीशिवाय यश प्राप्ती अशक्यप्राय राहील,वरिष्ठ आणि सहकार्यांचे धोरण छळवाद्यांचे राहील,कामाच्या श्रेयाचे विभाजन इतरांच्या खाती जमा होईल,नौकरी टिकवण्यासाठी विशेष धडपड करावी लागेल.व्यवसायासाठी हा महिना आव्हानात्मक असल्यामुळे प्रत्येक पाऊल जपुन टाकावे लागेल,घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे परिणाम दीर्घकाळासाठी भोगण्यास तयार व्हावे. पैशासाठी प्रचंड आटापिटा करावा लागल्याने मानसिक आणि शारिरीक तणाव जाणवेल.

कोर्ट कचेरी:- या बाबतीत हा महिना मागील पानावरून पुढे असा संकेत देणारा राहील.दीर्घकाळापासुन रेंगाळलेले खटले प्रगतीशुन्य राहतील,संयम आणि सबुरीने वाटचाल करावी लागेल,वकील मंडळींशी हुज्जत घालु नये सर्व खटल्याकडुन फारश्या अपेक्षा ठेवुन चालणार नाही.

नातेसंबध:- हा महिना या बाबती कटु अनुभव देणारा राहील,पुर्वी झालेल्या मतभेदांची तीव्रता आणखीनच वाढेल जाणीवपुर्वक मतभेदांची दरी मिटविण्यास प्राधान्य द्यावे लागेल. अन्यथा ही नाती कायम ताण-तणावात राहतील.जोडीदाराशी संयमाचे धोरण आणि सामंजस्य बाळगावे लागेल.

विद्यार्थी:- विद्यार्थी वर्गाला अस्वस्थ करणारा हा महिना राहील,अभ्यासक्रमाचा नियोजन विस्कळीत झाल्यामुळे तणाव जाणवेल,हे सगळ पुर्वपदावर आणण्यासाठी विशेष मेहनत घेतल्यास ध्येय दृष्टीक्षेपात येईल,पण कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवावे लागेल,पालक मंडळीनी विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासक्रमाबाबत तसेच अभ्यासातील प्रगती बाबत दक्ष रहावे.

मिथुन:-

ग्रहांची स्थिती: महिन्याच्या सुरवातीला शुक्र पंचम स्थानात गुरु सोबत महिनाभर भ्रमण करणार आहे.२ सप्टेंबरला राशीस्वामी बुध तृतीय स्थानात भ्रमण करणार असुन, १७ सप्टेंबर रवी चतुर्थात स्थानात येत असुन,त्याच्या पाठोपाठ बुध हि तिथे येऊन बुधातीत्य योग होत आहे. सप्तमात असलेला शनी, अष्टमातली मंगळ-केतु युती, व्येयातला राहु, हि ग्रह स्थिती पाहता सप्टेंबर महिना, मिथुन राशीसाठी बहुतांशी संमिश्र फळ घेऊन येणारा राहील.अष्टमात  होणारी मंगळ-केतु युती, महिन्याच्या उत्तरार्धात प्रचंड ताणताणाव निर्माण करेल,त्यामुळे हा महिना उन्ह-पावसाचा राहील .गुरु शुक्राची गोड फळे आणि मंगळ केतुची कडु फळे चाखावयास मिळतील.

आरोग्य:- या बाबतीत गुरु शुक्र भ्रमणाची शुभ फळे आरोग्य बाबतीत हि अनुभवयास येतील.महिन्याच्या पुर्वार्धामध्ये शारिरीक आणि मानसिक पातळीवर प्रचंड उत्साह जाणवेल.त्याच्या उलट अनुभव उत्तरार्धात येतील अचानकपणे प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील दुखापतीपासून सावध राहावे.

आर्थिक: या बाबतीत हा महिना बरेचसे उत्तम फळे देणारा राहील,हवा असलेला पैसा उपलब्ध झाल्यामुळे अनेक समस्यातुन बाहेर पडता येईल.रखडलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागतील महिन्याचा उत्तरार्ध मात्र तणावपुर्ण जाईल आर्थिक व्यवहारातुन फटका बसु शकतो आहे.आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यावी.

नौकरी व्यवसाय:  या बाबतीत यामधील स्थिती महिन्याच्या पुर्वार्धात उत्तम राहील.मनासारख्या गोष्टी घडल्यामुळे कामाच्या ठिकाणी उत्साह आणि आनंदी वातावरण राहील .हा आनंद टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.उत्तरार्ध मध्ये अचानकपणे काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील.नको त्या वादांना सामोरे जावे लागेल, ‘आपण भले आणि आपले काम भले’ अशी भुमिका ठेवावी लागेल.

व्यवसायामध्ये गुरु शुक्र युती, फळफळुन लाभ होईल,एखादे कर्ज प्रकरण मंजुर झाल्यामुळे खेळत्या भांडवलाची चिंता मिटलेली असेल.व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी पाऊले टाकण्यास हरकत नाही.पण मोठी जोखीम टाळावी लागेल. आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे.एखाद्या अस्थिर निर्णयाचा दीर्घकाळ फटका बसु शकत आहे.

कोर्ट कचेरी: या बाबतीत हा महिना दिलासादायक राहील,अनपेक्षितपणे एखादा निकाल मनासारखा लागेल,शक्यतो महिन्याच्या पुर्वार्धात महिन्याची कामे उरकुन घ्यावी,स्थावर मालमत्तेचे खटले महिन्याच्या उत्तरार्धात उग्र स्वरूप धारण करतील.वकील मंडळींशी हुज्जत घालणे टाळावे.

नातेसंबध: या बाबतीत ,नात्यातील बेबनाव दुर करण्यासाठी कालखंड उत्तम राहील.संपर्क संभाषण आणि भेटीघाटी यांच्यावर भर द्यावा.जोडीदाराशी जुळवून घ्यावे,नातेसंबंधा बाबतीत काही करार-मदार असतील तर महिन्याच्या पुर्वार्धात व्हावी गैरसमाज होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

विद्यार्थी:  विद्यार्थी वर्गासाठी हा महीना यशदायी राहील, तसेच अभ्यासामध्ये प्रगती साधता येईल, शिक्षक मंडळी खुश असतील. मनासारख्या अभ्यासक्रमाची सुरवात उत्तम झाल्यामुळे आत्मविश्वास दुणावेल.पालक वर्ग आनंदी आणि समाधानी राहील. महिन्याच्या उत्तरार्धात मुलांकडे विशेष लक्ष पुरवावे.एखाद्या लहान सहन दुर्घटनेला सामोरे जाण्याचे योग येतील.

कर्क :-

ग्रहांची स्थिती:- महिन्याच्या सुरवातील येणारा चतुर्थातला शुक्र गुरु सोबत महिनाभर भ्रमण करणार आहे.२ सप्टेंबरला धनात जाणारा बुध आणि १७ सप्टेंबरला कन्येत जाणारा रवी त्या पाठोपाठ १८ सप्टेंबरला कन्येत येणारा बुध ६ सप्टेंबर च्या दरम्यान षष्टात मार्गी होणार शनी राशीतला राहु आणि सप्तमातला मंगळ केतु हे ग्रहमान पाहता हा महीना काही शुभ फळे तर बरेच प्रतिकुल फळे देण्यास सज्ज आहे.ताण तणावातुन महिनाभर मार्गक्रमन करावे लागेल.

आरोग्य:-  या बाबतीत ६ सप्टेंबरला मार्गी झालेला शनी, आरोग्याबाबतीत उमेद वाढवणारा राहील खप दिवसांपासून जाणवणारी अस्वस्थता ताण-तणाव आटोक्यात येतील. महिन्याचा उत्तरार्ध, अचानकपणे काही तब्येतीच्या कुरबुरी निर्माण करेल.जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल व्यायाम,पथ्य आणि सुयोग्य आहार आणि विहार ठेवल्यास आरोग्याचा प्रश्न हाताळता येईल.

आर्थिक:- या बाबतीमध्ये हा महिना दिलासादायक राहील.अनपेक्षित रक्कम हाती आल्यामुळे काही देणी फेडता येतील,एखादे कर्ज प्रकरण मंजुर झाल्यामुळे हाती पैसा येईल,अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागेल,अन्यथा आर्थिक नियोजन कोलमडुन पडेल महत्त्वाचे आर्थिक व्यवहार, महिन्याच्या पुर्वार्धात करून घ्यावेत.

नौकरी व्यवसाय:- या बाबतीत हा महिना संमिश्र फळ देणार राहील,सध्याच्या नौकरी मध्ये उत्साह टिकवुन ठेवावा लागेल,नव्या उमेदीने आणि उत्साहाने कामाची सुरवात होईल, पण उत्तरार्धात मानसिक खच्चीकरण,ताणतणाव आणि वातावरण काहीसे अस्थिर होईल,वरिष्ठ सहकार्याशी वाद न घालता जुळवून घेतल्यास बरे राहील.नवीन संधी सध्या तरी दृष्टी क्षेपात येणार नाही.

व्यवसायाबाबतीत मार्गी शनी ,हालचालीला वेग आणेल,हातातले भांडवल योग्य प्रकारे हाताळल्यास नफ्याचे प्रमाण सहज वाढवता येईल,व्यवसाय वृद्धीसाठी नवीन उपाय शोधावे लागतील.पैशाचा ओघ वाढवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागेल यामुळे आर्थिक परिस्थिती आटोक्यात येऊन पत प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल.

कोर्ट कचेरी:- या बाबतीत हा महिना अनपेक्षितपणे अप्रतिम फळे देणारा राहील,जुने प्रलंबित खटले यशस्वी रित्या मार्गी लागतील,खुप दिवसांपासुन चढावी लागलेली कोर्टाची पायरी, पुन्हा चढावी लागणार नाही.स्थावर मालमत्तेचे खटले कोर्टाबाहेर यशस्वी समझोत्याने सोडविल्यास उत्तम राहील,वकील मंडळींचा योग्य सल्ला मुळे क्लिष्टतेपासून सुटका होईल.

नातेसंबध:- महिन्याचा पुर्वार्ध नातेसंबंधाच्या बाबतीत सुखाची पखरण करणारा राहील,प्रदीर्घ काळापासुन झालेले मतभेद आणि मनभेद पुढाकार घेऊन मिटवण्याच्या प्रयत्नान यश मिळेल.पुर्वार्धात मिळालेली जोडीदाराची साथ उत्तरार्धात मात्र अनपेक्षित पणे काही गैर- समाज निर्माण करणारी राहील,सामंजस्य आणि मतभेद विसरल्यास पुढील काळाची ठिणगी वेळीच विझवता येईल.

विद्यार्थी:- महिनाभर अभ्यासासाठी सुयोग्य वातावरण राहिल्यामुळे उत्साह आणि उमेद दिसेल,सकारात्मक मनाने अभ्यास करण्याची प्रवृत्ती जागृती होईल, आत्मविश्वास दुणावेल,लौकिक मानसन्मान प्राप्त करता येईल पालक वर्ग निश्चिंत होईल.पालकांनी उत्तरार्धात विद्यार्थी  वर्गानां दुखापती पासुन सांभाळावे पालक वर्गाने संततीकडे विशेष लक्ष द्यावे.

सिंह:-

ग्रहांची स्थिती:- महिन्याच्या सुरवातीला शुक्राचे भ्रमण तृतीय स्थानातुन होणार असुन,तिथेच गुरु हि आहे,राशीस्वामी रवी प्रथम आणि द्वितीय स्थानातुन भ्रमण करेल षष्ट स्थानामध्ये मंगळ केतु आणि व्येयातला राहु तसेच पंचमातला शनी हि ग्रहस्थिती पाहता सिंह राशींच्या जातकांसाठी हा महिना तितकासा दिलासादायक राहणार नाही.समस्यांच्या तीव्रता कमी होण्यास फारशी मदत होत नसल्याने भावनिक संतुलन आणि मानसिक बळ वाढवणे आपल्या हातात राहील.

आरोग्य:- या बाबतीत हा महिना ताणताणाव चिंता आणि दडपण देणारा राहील,प्रसंगी नैराश्याचे मळभ हि दाटू शकते आहे ,अशा स्थिती मध्ये स्वत:ला सावरणे हेच मुख्य धोरण राहील.वेळप्रसंगी हयगय न करता तातडीची वैद्यकीय चिकित्सा करून घेणे गरजेचे राहील.षष्टातील मंगळ-केतु युती उत्तरार्धात त्रास देण्याची संभावना असल्यामुळे दक्ष राहावे लागेल झोपेतील अनियमितता आणखीन या स्थितीत वाढ करेल.

आर्थिक:- या बाबतीत हा महिना मागील प्रमाणे पुढे असा जरी असला तरी आर्थिक कोंडी मोठ्या प्रमाणात सहन करावी लागेल,थकलेली देणी घटलेले उत्पन्न आणि उद्भवलेल खर्च यामुळे जीव अगदी मेटाकुटीस येईल.आर्थिक फसवणुकीचे ही योग राहतील.

नौकरी व्यवसाय : नौकरी बाबतीत मध्ये ताणताणाव हाताळताना आल्यामुळे बिकट स्थिती उद्भवु शकेल वरिष्ठ आणि सहकार्यांच्या त्रासामुळे वैतागुन जाण्याची वेळ येईल, ‘आपण आणि आपले काम भले’ हे धोरण ठेवल्यास ताण सुसह्य करता येईल कामाचा वाढीव बोजा अंगावर पडल्यामुळे, वेळेचे नियोजन कोलमडून पडेल.

व्यवसाया बाबतीत मागील घसरण सुरूच असल्यामुळे, मन चिंता करत राहील, कामात लक्ष घालणे नियोजन करणे आणि संयमाने पुढे रेटणे, हेच हाती राहील. हेही दिवस जातील या आशेवर मार्गक्रमण करावे लागेल आणखीन आर्थिक समस्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी.महिन्याच्या उत्तरार्धात एक मोठा आर्थिक फटका बसु शकत आहे.

कोर्ट कचेरी :- या बाबतीत मनासारखे निकाल न लागल्यामुळे मन खट्टु होईल आर्थिक भुर्दंड आणि प्रसंगी मानहानी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागेल.स्थावर मालमत्तेचे खटले प्रतिकुलते कडे वळल्यामुळे निराशा झटकुन नव्या उर्जेने त्यांना सामोरे जावे लागेल.

नातेसंबध:-  या पातळीवर हा महीन मानापमान कटुता गैरसमज आणि अपेक्षाभंग या सारख्या प्रसंगाचा अनुभव देऊ शकतो, ग्रहांची प्रतिकुलता सगळ्या नातेसंबंधावर पडल्यामुळे संयम श्रद्धा आणि सबुरी जपावी लागेल,जोडीदाराबरोबर जुळवून घ्यावे लागेल अर्थात टोकाची भुमिका निमिषार्धात घेतल्या जाईल,एकंदरीतच भावनिक आणि कौटुंबिक पतप्रतिष्ठा पणाला लागली असेल.

विद्यार्थी:-  विद्यार्थ्यांसाठी सध्याचा कालखंड दिलासादायक नक्कीच नाही, प्रसंगाची कटुता, मनासारखे न घडल्यामुळे आलेले नैराश्य ,पालक वर्गाचे दडपण आणि अपेक्षाभंग या मुळे हा महीना प्रचंड पिळवणुक करणारा राहील.पाहीजे त्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यामुळे खचुन न जाता नव्या जोमाने नव्या उर्जेने सामोरे जावे लागेल, पालक वर्गानी आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

कन्या:-

ग्रहांची स्थिती:- या महिन्याच्या सुरवातीला धनस्थानात असलेला शुक्र गुरु सोबत महिनाभर मुक्काम ठोकून राहील, २ सप्टेंबरला व्येयातला बुध,आणि १७ सप्टेंबरला व्येयातुन राशीत येणारा रवी तसेच बुध  पंचमातला मंगळ-केतु योग आणि लाभातला राहु,चतुर्थातला शनी हे ग्रहमान पाहता कन्या राशींच्या जातकांसाठी हा महिना दोन्ही प्रकारच्या म्हणजेच सुख आणि दुख: अनुभवन एकाच वेळी अनुभवण्याच योग आहे.

आरोग्य:- या बाबतीत महिन्याचा उत्तरार्ध प्रतिकुल राहील,शारिरीक पीडा मानसिक ताण-ताणाव अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल,वैद्यकीय उपचारांचा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे मन संचित राहील.आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे वाहन आदि चालवताना काळजी घ्यावी.  

आर्थिक:- या बाबतीत महिन्याच्या सुरवातीला गुरु शुक्र फळ देण्यास आरंभ करेल, त्वरित मंजुर झालेले एखादे कर्ज हातामध्ये पुरेसा पैसा उपलब्ध करेल.आर्थिक नियोजन करताना मात्र काळजी घेण सोयीस्कर ठरेल हि स्थिती मात्र उत्तरार्धात काहीशी बिकट होऊ  शकत आहे.उत्तरार्धात महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे अन्यथा एका मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

नौकरी व्यवसाय :- या बाबतीत ह्या महिन्याची सुरवात उत्साह आणि भपकेबाज होईल जसे जसा महीना पुढे सरकेल तसे तसे मनोबल क्षीण होत जाईल.अनपेक्षित पणे काही अनिष्ट बदलान सामोरे जावे लागल्याने मानसिक तणाव वाढेल महिन्याच्या उत्तरार्धात संपुर्ण जग आपल्या विरोधात आहे, अशी भावना निर्माण झाल्यास नवल नाही.या बिकट स्थितीला सामोरे जाताना मेहनती वर भर दिल्यास आणि सकारत्मकता ठेवल्यास हा महिना सहज काढता येईल.

व्यवसाया बाबतीत आर्थिक समस्यांना समरे जावे लागेल.सुरवातीला ग्रहांची अनुकुलता असेपर्यंत महत्त्वाचा कार्यभाग उरकून घ्यावा लागेल.उत्तराधाची तरतुद अगोदरच करून ठेवावी लागेल.कामाची गती टिकवुन ठेवताना प्रचंड कसरत करावी लागेल.

कोर्ट कचेरी :- या बाबतीत पूर्वार्धातील ग्रहांची चांगली स्थिती चा उपयोग उत्तम करून घेतल्यास काही खटल्यातून मार्ग काढता येईल, कोर्टाबाहेरची तडजोड फायदेशीर ठरेल.वकील मंडळींशी विनाकारण हुज्जत घालून चालणार नाही.एकंदरीतच तडजोडीची भुमिका ठेवल्यास उत्तम राहील.

नातेसंबध :- महिन्याची सुरवात जरी जोरदार झाली तरी, एक दोन आठवड्यात हा उत्साह ओसरू लागेल आणि अचानक कटुता निर्माण होईल,होणारे गैरसमज मतभिन्नता आणि विसंवाद टाळण्यासाठी तोंड बंद आणि काम चालु असे धोरण ठेवल्यास उत्तम.जोडीदाराशी समन्वय,सुसंवाद आणि सहवास ठेवावाच लागेल,रागावर नियंत्रण आणि प्रेमाची पखरण हा मंत्र महीना भर जपावा लागेल.

संतती:- विद्यार्थी वर्गाला हा महिना संमिश्र फळ देणारा राहील,शैक्षणिक बदलानां सकारात्मक रित्या सामोरे गेल्यास समस्या जाणवणार नाहीत.अभ्यासक्रमाची आखणी उजळणी आणि शिक्षकांशी सवांद हा उपक्रम राबवावा लागेल,पालक वर्गानी विद्यार्थ्यांकडे फक्त लक्षच देऊ नये तर त्यांच्याशी सुसंवाद आणि वेळेचा वर्षाव करावा लागेल.

तुळ:-

ग्रहांची स्थिती :या बाबतीत महिन्याच्या सुरवातीला राशीत येणारा शुक्र गुरु सोबत महिनाभर  वास्तव करणार आहे.२ सप्टेंबरला लाभत येणारा बुध १७ सप्टेंबरला व्येयात येणारा रवी तसेच बुध.तृतीयेत असणारा शनी,चतुर्थातला मंगळ-केतु, दशमातला राहु ही ग्रहस्थिती पाहता तुळ राशीच्या जातकांसाठी छप्पर फाडके लाभ असणार आहेत, अर्थात कर्म बंधनाचे संकेत पाळावे लागतील.थोडक्यात कसोटीचा काळ संपुन उत्तम काळ पुढे येत आहे.

आरोग्य:- या बाबतीत महिन्याच्या सुरवातीला राशीत आलेला शुक्र मनोबळ आणि उमेद वाढवणारा राहील.मानसिक ताणतणाव कमी झाल्यामुळे उत्साह वाढलेला असेल,महिना जसा जसा संपुष्टात येईल तसे तसे आरोग्यमान सुधारेल जुन्या व्याधी आणि दुखणे आटोक्यात येतील.एकंदरीतच हा महिना आरोग्याच्या बाबतीत उत्तम राहील.

आर्थिक:- या बाबतीत ह्या महिन्याच्या उत्तरार्ध नंतर शुभ फळ देणारा राहील, तोपर्यंत आर्थिक आघाडीवर जेमतेम परिस्थिती राहील, महिना संपता संपता आर्थिक प्रगती झपाट्याने अपेक्षित आहे. गौरी गणपतीचे उत्तम स्वागत करता येईल कर्ज मुक्तीच्या दृष्टीने पावले टाकल्यास उत्तम परतफेड करता येईल,अनावश्यक खर्च टाळल्यास बचत योग्य प्रकारे होईल.

नौकरी व्यवसाय:- या बाबतीत नौकरी मध्ये हा महिना पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा राहील.हळु हळु नौकरी मध्ये प्रगती साधता येईल,उत्तरार्धा मध्ये अचानक पणे काही बदल संभवतो आहे.अचानकपणे कलाटणी मिळेल,वरिष्ठ सहकार्यांशी जुळवून घ्याव लागेल नौकरी मध्ये बदल करण्याची वेळ अचानकपणे आल्याने गडबडून गेल्यासारखं वाटेल नवीन संधीचा योग्य शोध घेतल्यास नवीन नौकरी दृष्टी क्षेपात येईल

व्यवसाया बाबतीत जागरूकतेने व्यवहार करण्याचा कालखंड राहील महिन्याचा पुर्वार्ध अडथळे आणि अडचणीचा प्रवास अधोरेखित करणारा राहील स्पर्धकाशी तात्पुरता तह पुढील वाटचालीसाठी योग्य राहील स्पर्धेने डगमगुन न जाता नेटाने पुढे जावे, कामांच्या मागे लागल्यास कामे मिळतील.एखादे महत्त्वाचे काम अचानकपणे सामोरे आल्यास मोठ्या भांडवलाची गरज लागेल त्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागेल.

कोर्ट कचेरी:- या बाबतीत हा महिना उत्तरार्धात यशदायी राहील स्थावर मालमत्तेचे आणि तत्सम खटले अनुकुल राहतील कोर्टा बाहेर समेट होत असेल तर करायला हरकत नाही.वकील मंडळींशी समन्वय संवाद साधावा लागेल.

नातेसंबध :- या बाबतीत राशीत आलेला शुक्र महिनाभर असल्यामुळे नातेसंबंध बाबत काही शुभ फळे अनुभवयास मिळतील.सुयोग्य संवाद साधल्यास मतभेदांची दरी मिटुन मधुर संबंधाचा नवीन पुल निर्माण होईल मात्र यासाठी थोडे झटावे लागेल प्रसंगी दोन पावले टाकावी लागतील.जोडीदाराशी एकरूप होण्यासारखी संधी यासारखी नाही नव्याने एकमेकांची ओळख होईल.आनंदात मिठाचा खडा पडणार नाही हे बघावे.

विद्यार्थी:- या वर्गासाठी या महिन्यात काही अप्रतिम फळे अनुभवयास येतील अडी अडचणी अडथळे पार करून आता कुठे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येतील प्रेवेश प्रक्रियेला झालेला विलंब आता दुर होईल,अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित केल्यास मोठ्या उत्साहाने झेप घेता येईल  पालक वर्गाची चिंता मिटेल त्यामुळे घरा मध्ये प्रसन्नता राहील.

वृश्चिक:-

ग्रहांची स्थिती:- या बाबतीत  महिन्याच्या सुरवातीला व्येयामध्ये आलेला शुक्र-गुरु सोबत भ्रमण करणार आहे.२ सप्टेंबरला बुध  दशम स्थानामध्ये,लाभ स्थान मध्ये रवी आणि  रवी सोबत बुध लाभ स्थानात भ्रमण करत आहे,धन स्थानामध्ये शनी,तृतीय स्थानामध्ये मंगळ-केतु युती घडत आहे.भाग्यात राहु हे सगळे ग्रहमान पाहता हा महीना एकंदरीत अनुकुलता आणि प्रतिकुलता यांचे पारडे इकडे तिकडे करणारा राहील.

आरोग्य:- या बाबतीत हा महिना खुप अनुकुल राहील तब्येती बाबतीत काळजी करण्याच कारण राहणार नाही मात्र घरातील किवा कुटुंबातील वडीलधार्यांकडे आणि त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष केंद्रित कराव लागेल.आईच्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे.तरुण मंडळीनी व्यायाम आणि खेळ याकडे लक्ष द्यावे.

आर्थिक :- या बाबतीत महिनाभरात खर्चाचे आकडे वाढल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडुन पडेल.मागील काही काळापासुन सुरु असलेल्या आर्थिक विवंचना पिच्छा सोडणार नाहीत.आर्थिक नियोजन करावे लागेल,कर्ज प्रकरण योग्यप्रकारे हाताळावे.

नौकरी व्यवसाय:- या बाबतीत हा महिना फारसा दिलासादायक नसेल. वाढीव कामाचे दडपण आणि ताण सहन करावा लागेल,वरिष्ठ दाखल घेणार नाहीत आहे त्यावर समाधान मानणे योग्य राहिलं. नवीन संधी सध्या अपेक्षित नाही.

व्यवसायात आलेल्या संधीचे रुपांतर  यशात करावे लागेल,खर्च वाढतील,अडचणींवर मात करावी लागेल,कर्ज मंजुर होतील.एकंदरीतच हा महिना आव्हानात्मक जाईल,त्यामुळे प्रत्येक आघाडीवर काळजी घ्यावी लागेल.

 

कोर्ट कचेरी:- या बाबतीत प्रलंबित खटल्यांचा निकाल आता लागण्याची वेळ येऊ शकते आहे,मात्र यातील काही भाग किंवा काही खटले विरुद्ध हि जायची स्थिती आहे तशी मानसिकता ठेवावी प्रसंगी निकालातुन आर्थिक झळ हि बसु शकते आहे.स्थावर मालमत्तेचे निर्णय कदाचित विरोधात जातील,पण खटला तर संपुष्टात येईल याचे समाधान मिळवता येईल.

नातेसबंध:- या बाबतीत हा महिना बऱ्याच अंशी अनुकुल राहील त्यामुळे मन उत्साही राहील,आप्तस्वकीयांच्या गाठी-भेठी होतील,चर्चा विनिमायातुन समस्यांवर मार्ग निघेल.मतभेदांची दरी कमी होईल,भेटी-गाठी मुळे नात्यांना उजाळा येईल जोडीदारा बाबतीत सौख्यपुर्ण स्थिती राहील संयम-संवाद-सबुरी आणि सृजनशीलता याचा मेळ साधल्यास नात्याला नवीन पालवी फुटेल.

विद्यार्थी:- या वर्गाल हा महिना गणरायांच्या आगमनामुळे टवटवी उत्साह आणि उमेद देणारा राहील. मनासारख्या अभ्यासक्रमासाठी झालेला विलंब या महिन्यात मार्गी लागेल.हवा तो अभ्यासक्रम आणि संस्था मिळाल्यामुळे अभ्यासाकडे प्रचंड उर्जेने लक्ष देता येईल.पालकवर्ग पाल्यांच्या व्यस्ततेमुळे सुखावतील एकंदरीतच शैक्षणिक संर्दभाचे योग्य ते निराकरण झाल्यामुळे घरादारात उत्साह राहील.

धनु:-

ग्रहांची स्थिती:- या बाबतीत महिन्याच्या सुरवातीला लाभ स्थानात आलेला शुक्र गुरु सोबत महिनाभर सोबतीला असेल तसेच २ तारखेला दशमात आलेला बुध आणि १७ तारखेला दशमात आलेला रवी, लग्नी असलेला शनी ,मंगळ केतु अष्टमातला राहू, हि स्थिती पाहता धनु राशींसाठी जीवनाच्या या टप्प्यातील ,अडीअडचणी वर न तसेच मार्गातील अडथळ्यांवर  उपाय करून जिद्दीने आणि उत्साहाने पुढे जाण्यास सांगतो आहे.

आरोग्य:-  या बाबतीत हा महीना दोन टोकाचे अनुभव देणारा राहील पुर्वार्धात तब्येतीच्या विशेष तक्रारी राहणार नाही मात्र जसा जसा महिना पुढे सरकेल उत्तरार्धामध्ये आरोग्याविषयी चिंता आणि तणाव जाणवण्यास सुरवात होईल अचानक शारिरीक दुखणी उद्भवतील .उत्तरार्धात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे विशेष जपावे लागेल.वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.

आर्थिक:- या बाबतीत महिन्याचा पुर्वार्ध आकस्मित पणे शुभ फळ देणारा राहील,एखाद कर्ज प्रकरण आकस्मितपणे फळफाळुन येईल. मात्र महिन्याचा शेवट अचानकपणे, आर्थिक नुकसान आणि तणावाला सामोरे जाण्याचे संकेत स्पष्टपणे देत आहे.एखादा घेतलेला निर्णय मोठा आर्थिक फटका देऊन जाईल. आर्थिक नुकसानी बरोबर काही चोरी अथवा मौल्यवान वस्तुची हानी दर्शवितो आहे.

नौकरी व्यवसाय :- या बाबतीत महिन्याची सुरवात उल्लेखनीय राहिल कार्य क्षेत्रात प्रभाव जाणवेल वरिष्ठ सहकार्यांच विशेष सहकार्य लाभेल,बढती किंवा मानसन्मानाचे प्रसंग येतील महिन्याचा शेवट मात्र अकल्पितपणे वळण घेईल हातुन झालेली एखादी चुक नौकारीवर गडांतर आणु शकेल.

व्यवसाया बाबतीत हा महिना अस्थिरता सुचक राहील,महिन्याच्या मध्यापर्यंत उंचावलेला आर्थिक आलेख उत्तरार्धात बऱ्यापैकी खाली आलेला असेल.आवक घटुन देणी वाढलेली असतील, देणिदारांना तोंड देताना नाकीनाऊ येतील,महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेताना सुनियोजन करावे.

कोर्ट कचेरी :- या बाबतीत हा महिना बऱ्यापैकी साथ देणारा राहील,पुर्वार्धात शक्यतो खटल्याच्या संबंधित मोठी कामे पार पडून घ्यावीत, महिन्याचा उत्तरार्ध कायदेशीर कटकटी आणि शासकीय कामात अडीअडचणी दर्शिवणारा राहील.वकील मंडळींशी खटके उडतील. त्यामुळे या महिन्यात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये याची प्रचीती येईल.

नातेसंबध:- या बाबतीत हा महिना काही अप्रतिम तर काही साधारण अनुभव येतील,सणवारामुळे कौटुंबिक वातावरण उत्साही आणि आनंदी राहील.रुसवे फुगवे दूर होतील, कुटुंबामध्ये आनंददायी घटना घडतील.महिन्याचा शेवट काही बिकट अनुभव देणारा राहील,काही चित्र-विचित्र अनुभव येतील त्यामुळे शक्यतो परिस्थितीशी जुळवुन घेतलेलंच बर राहील.जोडीदाराबाबतीत मनाजोगते सौख्य प्राप्त करण्यासाठी जोडीदाराच्या एखाद्या आवडणाऱ्या गोष्टीचा पाठ पुरावा करा.

विद्यार्थी:- या बाबतीत अभ्यासक्रमा बाबतीत एक महत्त्वाचा कालखंड आरंभ होईल,मनासारख्या अभ्यासक्रमाची प्रेवेश प्रक्रिया पार पडल्याने एक नवीन हुरूप आलेला असेल.दैनंदिन वेळापत्रकाची गाडी रुळावर येण्यास सुरवात होईल.पालक वर्ग संचित झालेले असतील इतक्या दिवस पाल्यांची लागुन राहलेली काळजी मिटलेली असेल.

मकर:-

ग्रहांची स्थिती:- या बाबतीत महिन्याच्या सुरवातीला दशम स्थानामध्ये आलेला शुक्र महिनाभर गुरु सोबत भ्रमण करणारा राहील,तसेच महिन्याच्या मध्याला अष्टमातुन भाग्यात येणारा रवी महिन्याच्या सुरवातीला अष्टमात जाणारा बुध पुन्हा भाग्यात जाणारा बुध राशी मधेच असलेले मंगळ केतु सप्तमातला राहु आणि व्येयातला शनी ही ग्रहस्थिती पाहता मागील काही महिन्यापासून कटु अनुभवांची मालिका सुरुच राहील.महिन्यातील प्रतिकुलता धैर्य एकवटुन संयम बाळगुन सहन करावी लागेल.

आरोग्य:- या बाबतीत साडेसातीतील शनीचे भ्रमण आणि अष्टमातला रवी प्रकृतीच्या तक्रारी वाढवणारे ग्रहमान राहील त्यामुळे हा महिना तब्येतीच्या कुरबुरी आणि तक्रारी असणारा राहील मानसिक चिंता राहील,मनोबल कमी झाल्यामुळे उत्साह जाणवणार नाही.लहान सहान दुख:ण्यानी डोके वर काढल्याने प्रतिकार क्षमता क्षीण झालेली असेल,स्वत: बरोबर घरातल्या इतर सदस्यांची हि काळजी घ्यावी लागेल.

आर्थिक:- या बाबतीत मध्ये हा महिना चिंता करावयास लावणारा राहील घटलेले उत्पन्न आणि वाढलेले खर्च याचा ताळमेळ कसा साधावा,या विवंचनेत महिन्याचा कालखंड खर्च  होईल,आर्थिक फसवणुकीचे योग असल्यामुळे घाई घाई ने निर्णय घेणे टाळावे कोणावर विश्वास ठेवु नका.जो इतरांवर विसंबला त्याचा कार्यभाग संपला याची प्रचीती या महिन्यात येईल.

नौकरी व्यवसाय:- या बाबतीत या महिन्याकडुन फारश्या अपेक्षा ठेवुन चालनार नाही. आला दिवस ढकलण एवढेच आपल्या हाती राहील,वाढीव कामाचा बोजा आणि तणाव वाढणार आहे,सहकारी आणि वरीष्ठांबरोबर वाद होतील,त्यामुळे परिस्थिती अशांत राहील,हातातली नौकरी टिकवण एवढंच सध्या आपल्या हातात राहील.

व्यवसाया बाबतीत समस्यांचा डोंगर आहे तसाच राहील,सर्व बाजुंनी ढग दाटुन आल्यासारखे  वाटेल संयमाने आणि शांततेने मार्गक्रमन करणे एवढेच हातात राहील,असलेली येणी वसुल होताना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागेल आणि देणी देण्यासाठी देणीदरांचा तगादा मागे लागेल.

कोर्ट कचेरी:- या बाबतीत  दीर्घ काळापासुन रेंगाळणारे खटले अजुनही निकाली निघणार नाहीत.स्थावर मालमत्तेचे विवाद वेगळ वळण धारण करतील.न्यायालयीन प्रक्रिया त्रस्त करेल या महिन्यामध्ये कामकाजा बाबतीत फारशी प्रगती अपेक्षित धरून चालणार नाही.कागदपत्रांची पुर्तता आणि जतन प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळावी.

नातेसंबध:- या बाबतीत आलेले तणाव आणि वितुष्ट काही केल्या कमी होण्याचा चिन्ह दिसणार नाही.त्यामुळे कौटुंबिक आघाडीवर आणि नाते सबंधाबाबतीत फारश्या अपेक्षा ठेवुन चालणार नाही असलेले मतभेद अजुन वाढणार नाही,याची दक्षता घेणे क्रमप्राप्त राहील.वैवाहिक सौख्यावर हा महिना जास्त तणाव निर्माण करणारा राहील.जोडीदाराचे स्वरूप समोर येईल,समन्वय-संवाद-सहवास वाढवावाच लागेल.

विद्यार्थी:- या बाबतीत हा महिना अध्ययनात अडथळे निर्माण करणारा राहील कुठेही लक्ष विचलित होऊ न देता अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे राहील “नजर हटी दुर्घटना घटी” याची अनुभूती या महिन्यात येईल. अभ्यासक्रमाबाबतीत काटेकोर शिस्त आणि नियोजन हे करावेच लागेल.पालक मंडळीनी मुलांच्या प्रगतीकडे दक्ष राहून लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ:-

ग्रहांची स्थिती:- या बाबतीत महिन्याच्या सुरवातीला भाग्यात आलेला शुक्र गुरु सोबत भ्रमण करणारा आहे तसेच सप्तमात आलेला बुध मध्या नंतर अष्टमात जाईल ,त्या नंतर रवी मध्या नंतर अष्टमात जाईल लाभत असलेला शनी व्येयात असलेला मंगळ केतु शष्टात असलेला राहु हे ग्रहमान पाहता हा महिना प्रतीकुलता आणि अनुकुलता याचे पारडे समसमान ठेवणारा राहील क्वचित प्रसंगी राशीस्वामी मुळे पारडे अनुकुलतेकडे झुकण्याची संभावना आहे.

आरोग्य:- या बाबतीत अप्रतिम आणि उत्तम फळे देणारा हा महिना राहील. आरोग्याचा झालेला भरभरून लाभ, त्याच्या मुळे आलेली झळाळी यामुळे उत्साह जाणवेल. सतेज कांती उत्साही, मन भाद्रपदाच्या सामोरे जाण्यास सज्ज होईल.

आर्थिक:- या बाबतीतल घडामोडींना वेगवान करणारा असा हा सुंदर महिना राहील.अनपेक्षितपणे  धनलाभ होतील आर्थिक नियोजनाचे उत्तम फळ या महिन्यात प्राप्त करता येईल,पुढील वाटचालीसाठी उर्जा पुरवणारा हा महीना राहील.कर्ज आणि देणी फेडताना सुलभता निर्माण होईल.

नौकरी व्यवसाय:- या नौकरी बाबतीत अतिशय उत्तम असा कालखंड राहील.कामाचे नियोजन वरिष्ठांची मर्जी सहकार्यांच प्रेम आणि आलेला उत्साह यामुळे कामाच्या ठिकाणी आनंदाचे कारंजे सतत उडत राहील,मानसन्मान आणि लौकिक प्राप्त होईल.एखादा पुरस्कार मिळण्याचे योग राहतील कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढल्याने कामाच्या ठिकाणी अमुलाग्र बदल होण्याचा योग राहील,नवीन संधीची प्रतीक्षा करणार्यांसाठी हातात कौल लेटर येऊन पडेल.

व्यवसायाचा वाढलेला व्याप आणि उपलब्ध भांडवल याची सांगड घालणारा हा महीना राहील .नवीन संधी नवीन आव्हाने सहज पेलता येतील.मागील काही निर्णयाचा अप्रतिम लाभ या महिन्यात होतील व्यवसायाचे विस्तारीकरण करण्याचे योग येतील.

कोर्ट कचेरी:- या बाबतीत अपेक्षित निकाल हाती येण्याचे चिन्ह राहतील स्थावर मालमत्तेचे खटले निकाली निघतील त्यातून मन:शांती आणि आर्थिक लाभ दोन्ही येतील वकिलांचा सल्ला यशस्वी होईल.

नातेसंबध:- या बाबतीत आनंदाची पखरण करणारा हा महिना नातेसंबंधात ही आनंदाचा वर्षाव करणारा राहील,सुसंवाद प्रस्थापित झाल्यामुळे विसंवादाची दरी बुजविल्या जाईल.आग्रहाचे निमंत्रण आणि प्रशंसा असा योग नातेसंबंध कडुन येईल एखादे जुने वैर संपुष्टात येईल.जोडीदाराशी सहजीवनाचा आनंद उपभोगताना गगन ठेंगणे झाल्याचा अनुभव येईल.

विद्यार्थी:- या बाबतीत हा महिना उत्साहाने परिपूर्ण आणि अभ्यास मध्ये विशेष प्राविण्य आणि यश देणारा राहील.अभ्यास करा आणि मार्क मिळवा अशी योजना ग्रहांची राहील मात्र कर्म हे करावेच लागतील,अभ्यासक्रमा बाबतीत उत्साह आणि सुलभता जाणवेल पालक मंडळी समाधानी होतील.

मीन:-

ग्रहांची स्थिती:- या बाबतीत महिन्याच्या सुरवातीला अष्टमात आलेला शुक्र, गुरु सोबत महिनाभर भ्रमण करेल. षष्टात आलेला बुध ,मध्याला सप्तमात आलेला रवी आणि पुन्हा मध्याला सप्तमात आलेला बुध, दशमातला शनी, लाभातले मंगळ केतु आणि पंचमातला राहु, ही ग्रहदशा पाहता, मीन राशीसाठी हा महिना संमिश्र फलदायी राहील.ग्रहांची अनुकुलता आणि प्रतीकुलता समसमान राहील आणि त्यामुळे या महिन्या कडुन फारश्या अपेक्षा ठेवुन चालणार नाही.

आरोग्य:- या बाबतीत विस्कळीत झालेली घडी म्हणावी तशी अजुन बसलेली नसेल,मनोबलाच्या अभावे मानसिक गोंधळ निर्माण होईल.आरोग्याची स्थिती हळु हळु पुर्वपदावर येईल योग्य उपचारांची मात्रा आरोग्यास मिळाल्यामुळे प्रकृतीस आराम पडेल.घरातल्या मंडळीनंच्या प्रकृती कडे लक्ष देणे गरजेचे राहील.

आर्थिक:- या बाबतीत हा महिना अस्वस्थ करणारा राहील पैशांची चनचन जाणवेल,आर्थिक निर्णय घेताना खुप दक्षता बाळगावी लागेल.कर्जाची परत फेड संथ गतीत होईल वाढीव कर्ज घेणे टाळावे उत्पन्नाचे स्रोत कसे वाढेल याकडे लक्ष द्या.

नौकरी व्यवसाय:- या बाबतीत जेसे थे वैसे स्थिती राहील कामाच्या ठिकाणी उत्साह जाणवणार नाही आणि परिस्थितीत हि फारसा फरक पडणार नाही प्रसंगी कामाचा वाढीव तणाव वाढल्यामुळे मन संभ्रमित राहील वरिष्ठ सहकार्यांशी जुळवून घेताना विशेष श्रम घ्यावे लागतील .नवीन नौकरी सध्या मिळणार नाही.

व्यवसाय बाबतीत भांडवलाची निकड निर्माण झाल्यामुळे कामे खोळंबतील तसेच पैशाची उभारणी करताना प्रचंड श्रम करावे लागतील.व्यवसाय टिकवुन ठेवण्यासाठी विशेष कष्ट उपसावे लागतील नवीन योजना सध्या तरी कार्यान्वीत होणार नाही.

कोर्ट कचेरी:- या बाबतीत तारीख पे तारीख अशी स्थिती राहील तांत्रिक अडचणी आणि विलंबामुळे अपेक्षित निकाल येणार नाही .स्थावर मालमत्तेचे व्यवहार आणि खटले अडकुन पडतील.

नातेसंबध:- या बाबतीत मतभेद आणि तणाव अश्या स्थितीला सामोरे जावे लागेल, वितुष्ट वाढणार नाही याची काळजी घ्यावी कर्तव्या पुरते संबंध प्रस्थापित केल्यास मन:स्ताप होणार नाही.जोडीदाराबरोबर उडालेले खटके प्रसंगी उग्र रूप धारण करतील वेळीच समेट घडवावा हे उत्तम दुखावलेली मन सांधता विशेष कष्ट उपसावे लागतील.

विद्यार्थी:- या बाबतीत अभ्यासाच्या एकाग्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा महीना राहील आपल्याला योग्य आकलन होते कि नाही हे तपासावे लागेल,अभ्यासासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल.अभ्यासक्रमाबाबतीत विशेष सराव करावा लागेल. पालक मंडळीनी विद्यार्थ्यांकडे योग्य वेळी लक्ष देणे हिताचे राहील.

|| शुभम भवतु  ||