शनि-एक काळ कठोर न्यायप्रिय शासक

शनिचे शासन पृथ्वी वरचे सगळे जीव अनुभवतात.या काळ कठोर शासनातुन कोणाचीच सुटका नसते. मेरा वचन ही है मेरा शासन या बाहुबलीतील शिवगामीच्या संवादा प्रमाणे खरोखर हे शासन कर्तव्य कठोर असते.जीवनात प्रत्येकालाच हमखासपणे या शासनाला सामोरे जावे लागते.जेव्हा शनि महाराज त्यांच्या शासना अंतर्गत धारा १४४ लागु करतात , तेव्हा राजापासुन रंका पर्यंत सगळेच सुतासारखे सरळ  होतात.दर ३० वर्षांनी या कर्तव्य कठोर शासकाचा लेखा जोखा मांडण्याचा जेव्हा काळ येतो तेव्हा भले भले हतबल होतात ही शासन व्यवस्था एक अशी अवस्था असते ज्यात प्रत्येक व्यवस्था ही येथेच्छ धुवून निघते  शनिची ही धुलाई निरभ्र निर्मळ आणि अति स्वच्छ असते कारण त्यांच्या  नजरेतुन कुठल्याही प्रकारची करता अस्वच्छता लपत नाही साठलेला प्रचंड मळाचा शनि निचरा करून टाकतो.

अशा या शनीच्या व्यवस्थेची भीती जनमानसात तीव्र आहे व जो तो शनिला प्रचंड घाबरून असतो.एक काळ कठोर शासकाच्या भुमिकेत शनिला बरेच काही प्रश्न मार्गी लावावे लागतात त्यामुळेच त्याचे प्रत्येक राशीतील अडीच-अडीच वर्षातील भ्रमण अंतर्बाह्य साफसफाई करणारे असते.बाह्य स्वच्छता तर तो यथेच्छ करतोच पण मनुष्यला सुद्धा हा अंतर्भुत बदलुन टाकतो.शनि-शासनाच्या कार्य शैलीचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच झालेले शनिचे मकर राशीतील भ्रमण होय.मकर म्हणजेच स्वतःच्या राशीत म्हणजेच  स्व-गृही प्रवेश करताच शनिने प्रचंड वेगाने साफसफाई करण्यास आरंभ केले.संपुर्ण जगच या साफसफाइने अंतरबाह्य बदलुन गेले आहे.पृथ्वीवरचा प्रत्येक जण आपापल्या घरातच किंबहुना  स्वकोशातच बंदिस्त झाला ,दळण-वळण तर पार ठप्प झाले,पार आकाशापासुन-रस्त्या पर्यंतची गतिमान चक्रे थंडावली.राजा पासुन रंका पर्यंत जो तो स्वत:च्याच आत्मचिंतनात मग्न झाला. अहंकाराचा मुखवटा गळुन ज्याच्या त्याच्या नका तोंडावर हतबलतेची  पट्टी आली.ही हतबलता इतकी पराकोटीची झाली कि,उन्माद,उपभोग,मत्सर,मोह,माया आदी विकार कुठच्या कुठे पळुन गेले.कारण शनिच्या सत्तेपुढे कोणाचीच मक्तेदारी चालत नाही.शनिचा एक साधा नियम आहे कि भोग भोगा आणि मोकळे व्हा,ज्याचे जैसे कर्म त्याचे तैसे भोग अर्थात या भोगापासुन कोणाचीच सुटका नाही.साडेसातीच्या अवस्थेत तर पार मनाचे खच्चीकरण होते.शनि केलेल्या कर्माचा लेख-जोखा काळाच्या पटलावर व्यवस्थित मांडुन थकबाकीची गोळाबेरीज समोर मांडतो.ही थकबाकी म्हणजे एक मोठे शुन्य असते आणि विशेष म्हणजे शनि समोर कोणाचीही वकिली चालत नाही किमंबहुना शनि ती चालु देत नाही,व्यक्तीला योग्य मार्गावर आणुन त्याच्या चुकांची तसेच त्याने केलेल्या गुन्ह्यांची जाणीव करवुन देऊन व्यक्तीला कठोर शासन करणे हा शनिच्या निपक्षपातीपणाचा  महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्याच्या या कर्म-विकापात जीवनात संघर्षदायी क्लेशदायी घटना घडतात.विकार, विलाप, विनाश, विद्रोह, विघटन, विशुद्धी आदी अवस्थेला सामोरे जावे लागते,जीवन मृत्युचे चलचित्र अशा या कर्तव्य दक्ष कर्म कठोर आणि तितक्याच निष्ठुर न्यायाधीशाच्या तावडीत सापडल्यावर जो न्याय मिळतो त्यातुन मनुष्य तावुन सुलाखुनच बाहेर पडतो.नियती व दैव यांचा योग्य तो उलगडा संथ पणे करतो आणि कुठलीच सुक्ष्म बाब दुर्लक्षित न करता सोडता योग्य असा न्याय निवाडा शनि मनुष्याला करवुन देतो.शनि म्हणजे सत्य निष्ठता न्याय प्रियता, समय सुचकता, मानसिक प्रगल्भता,दुरदर्शिता,विरक्ती कर्म कर्तव्य परायणता संयम व सबुरी हि दोन शस्त्रे आणि कर्मप्रधानता हा शनिचा प्राण म्हणता येईल.शनि हा नित्य काळाचा शिक्षक आणि अनंत काळाचा मार्गदर्शक आहे.शनि जरी कर्तव्य कठोर शासक असला तरी त्याची शासन व्यवस्था मनुष्याच्या चांगल्या साठी असते,शनिच्या ह्या शासन व्यवस्थेची आचार संहिता जर व्यक्तीने पाळली तर व्यक्ती जीवनाची लढाई जिंकते.

ज्योतिष्यशास्त्रात शनि या ग्रहाला अनन्य साधारण महत्त्व आहे.जन्म पत्रिकेतील तो एक अतिमहत्त्वाचा ग्रह असुन बारा राशी बारा भावांमधील त्याची उपस्थिती आयुष्याचा बोध सांगुन जाते.शनि ग्रहाची गती अतिशय मंद असते त्यामुळे एक राशी भोगायला शनिला अडीच वर्षे लागते शनिचे पत्रिकेतील भ्रमण जेव्हा बाराव्या,प्रथम व द्वितीय स्थानातुन होते तेव्हा जातकाची साडेसाती आरंभ होते.

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा काळ जो अडथळे,नुकसान,अडचणी,विरह,विकार,विराम क्लेश,दुख,मानसिक-अस्थिरता,मानसिक दुर्बलता, आळस आणि अकर्मता आदींनी परिपुर्ण असतो,त्यामुळे या कालखंडाला सगळे जण घाबरतात.परंतु प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी असते शनि प्रत्यक्षात कर्माची महती सांगणारा ग्रह आहे.कर्मरूपी हत्तीचा  शनि हा माहुत असतो.शनिच्या ठायी कर्माला जीवनात अग्रस्थान आहे त्यामुळे  मनुष्याचे पुर्वकर्म मांडतो.जीवनातील कर्माचा मार्ग दाखवताना खाचखळग्याचा प्रवास व आत्मसयंम शिकवतो.ज्याला त्याला कर्म हे करावेच लागतो प्रयत्नांविना कर्म नाही आणि कर्मा शिवाय मुक्ती नाही त्यामुळे कर्म करा आणि भोग भोगा व मुक्त व्हा. आकुचंन पावणे,अन्त्रस्त होणे,हा मुळ स्वभाव असल्याने मानसिक प्रगल्भता आणि विरक्त मनोवृत्ती शनि धारण करतो.साडेसातीत चौथा व आठवा शनि जीवनातील परिक्षेचा कालखंड असतो जो या परिक्षेत उत्तीर्ण झाला तो जीवन प्रवाहाच्या पुढील वाटचालीकडे गतिमान होतो मुक्त होतो.जो अनुउत्तीर्ण झाला तो या भाव सागरात गटांगळ्या खात खितपत पडतो.अश्या जीवाला गती मिळत नाही व मुक्ती मिळत नाही.

वैशाख अमावस्या या  तिथिला शनि चा जन्म झाल्यामुळे या दिवशी शनि जयंती साजरी करतात या वेळेस वैशाख अमावस्या २२ मे रोजी असुन शनि ग्रहाचे भ्रमण मकर राशीत सध्या वक्री अवस्थेत सुरु आहे.असा हा शांत धीरगंभीर पणे वाटचाल करणारा ग्रह समस्त जगाला आपल्या आटोक्यात ठेवत आहे.कर्तव्य दक्षतेने जीवनातील अडथळे पार करून नव्या गतीने जो मार्गक्रमण करतो दुरदृष्टी आणि चिकाटीने काम करतो त्याला शनि भरभरून देतो मात्र त्यासाठी संयमित पणा सत्य निष्ठता कर्तव्य परायणता कृतज्ञता आणि नितीमत्ता या शनिच्या महत्त्वाच्या अटी आहेत.या अटी ज्यांनी पाळल्या त्यांना शनि भरभरून देतो. “उपरवाला जब भी देता देता छप्पर फाडके”.या उक्ती प्रमाणे.

!!!शुभम भवतु!!!