\\ गुरुपौर्णिमा \\

|| गुरु पुजन महोत्सव ||

     आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हंटले जाते.यावर्षी म्हणजेच विक्रम संवत २०७५ ,विलंबी नाम संवत्सर वर्षा ऋतु इसवी सन २०१८, आषाढ शुक्ल पौर्णिमा शुक्रवार २७ जुलै, या रोजी गुरुपौर्णिमा येत आहे.याच दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाल्यामुळे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात,आषाढ पौर्णीमेचे आणखी एक महत्त्व म्हणजे सन्यस्तांचे चातुर्मास व्रत आरंभ होतो.

     देवशयनी आषाढी एकादशीला विष्णु शयनाचा उत्सव असतो, तसाच आषाढ पौर्णिमेला शिवशयन उत्सव साजरा केल्या जातो.प्राचीन भारतीय परंपरे मध्ये गुरु पुजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.देवर्षी,महर्षी,ऋषी मुनी सह गुरूंचे पुजन स्मरण चिंतन करण्याची पौर्णिमा म्हणजे आषाढस्य व्यासपौर्णिमा.

     सद्गुरूंची प्राप्ती होणे ही अत्यंत भाग्यकारक घटना असुन,ती कधी मिळेल असे ,सांगता येत नाही,भवसागर रुपी जीवन जगताना प्रत्येकाला पडलेल्या असंख्य प्रश्नांचे निराकरण तसेच मार्गदर्शन तसेच ज्ञान संवर्धन करणारी एकमेव शक्ती म्हणजे गुरु होत.

     जन्म देणाऱ्या शक्तीपेक्षा,ज्ञान देणाऱ्या शक्तीला श्रेष्ठ मानले जाते म्हणुनच गुरुला महत्त्व आहे.संतकबीर म्हणतात “तीर्थ नाहाये एक फल संत मिले फल चार |सद्गुरू मिले अनंत  फल”,कहत कबीर विचार.

     सद्गुरूंची प्राप्ती आणि यामुळे मिळणारे फळ याची तुलना केली जाऊ शकत नाही.प्राचीन परंपरेमध्ये गुरु पौर्णिमेचे महत्त्व विषद करताना,असे सांगितल्या जाते कि,या पौर्णिमेचा पर्वकाळ, ऋषींनी असा योजीला होता कि, आषाढ ते कार्तिकी हा चार महिन्यांचा काळ म्हणजे प्रसन्न करणारा वर्षा ऋतुचा काळ मानल्या जातो,अल्हाददायक काळ मानल्या जातो,सर्वत्र उन्ह-पावसाचा खेळ आणि मेघांनी तृप्त झालेली धरित्री हिरवा शालु पांघरून वसुंधरेच रूप मनाला उल्हासित चैतन्य समृद्ध करते.अशा ह्या पवित्र वातावरणात प्राचीन गुरु शिष्य परंपरेनुसार विद्यादानाचे पर्व सुरु व्हायचे,फिरतीवर असलेले संन्यासी पावसाळ्यामुळे एका ठिकाणी वृत्तस्थ होत.वृतस्थ संन्यास्यां कडुन ज्ञानार्जन करण्यासाठी भक्त जणांची एकच झुंबड उडे.तसेच नवीन अध्यन सत्र गुरुकुलामध्ये या काळातच सुरु होई.असे हे महापर्व भारतीय परंपरेत गुरूची महती सांगणारे आणि पुजन करनारे दैदीप्यमान पर्व आहे.

|| शुभम  भवतु ||