!! श्री !!

गुढीपाडवा : नवीन वर्षारंभ !

विकारीनाम नुतन संवत्सर प्रारंभ !!

इंग्रजी ६ मार्च, शनिवारी सुर्योदया नंतर चैत्र शुक्ल पक्ष शके १९४१,विक्रमार्क संवत २०७५ रोजी विकारीनाम संवत्सर आरंभ होत आहे.शालिवाहन शक १९४१ म्हणजे इंग्रजी कालगणना व शालिवाहन शक या मध्ये ७८ वर्षांचे अंतर आहे.चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी हिंदु कालगणनेची वर्षा आरंभची सुरवातीची तिथी म्हणुन साजरी करण्यात येते.ह्याला वेदकालीन संदर्भ असुन चैत्र मास हा चित्रा नक्षत्राच्या संबंधित असुन प्रचंड उर्जा तत्त्व आणि शुभ किरणांचा वर्षाव ह्या ऋतु काळात होत असतो.सर्वांगसुंदर असा वसंत ऋतु हळु हळु लोप पावतो व ग्रीष्म आरंभ होतो.वसंत भ्रमण सुर्य संपतावर येते पानांची पानगळ संपुन गेलेली असते व वृक्षांना नवीन पालवी फुटते.वृक्षवल्ली ,निसर्ग व पानेफुले एका तेजाने चैतन्याने भारीत असतात.

पौराणिक संदर्भानुसार ब्रम्हदेवाने या दिवशी सृष्टीचे नवनिर्माण केले असे म्हणतात.ह्या दिवशी अभ्यंग स्नान करून वास्तु सुचिता व साफ सफाई करून दारी आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात.सडा सारवण करून रांगोळी काढतात.घराच्या बाहेर योग्य ठिकाणी गुढी उभारली जाते.योग्य आकारचा व उंचीचा वेळु घेऊन त्याच्या वरील टोकास नवीन खण बांधतात खणावर कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी व आंब्यांच्या पानांची डहाळी बांधुन हिरवाईने तिला सजवतात त्यावर साखरेच्या गाठी बांधतात.त्यावर ताम्र धातुचा कलश उपरा लावुन त्यावर स्वस्तिक रेखाटतात अशी ही गुढी सजवुन दारात उभारली जाते.ह्याच गुढीला ब्रम्ह ध्वज असेही म्हणतात.गुढीची यथा योग्य पुजा करून ऊँ ब्रह्म ध्वजाय नम:। हा मंत्र म्हणतात.

पुजा झाल्यावर कडुलिंबाचे चुर्ण खावे अशी प्रथा आहे.त्यामुळे सर्व व्याधींचा नाश होतो.देवघरात दिवा लावुन योग्य ती आरास करावी.ह्याच दिवशी पंचांगाचे पुजन करतात.पंचाग्स्थ गणपतीचे पुजन करतात.पंचांगातील संवत्सर फळाचे भक्ती पुर्वक श्रवण करतात.वडीलधार्यांचा आशीर्वाद घेतात.गुरूंचे पुजन करतात.गोरगरिबांना दान धर्म करावा.सुर्य ज्या प्रमाणे अंधाराचा नाश करतो,त्याप्रमाणे संवत्सर फल श्रवणाने सर्व विघ्नांचा नाश होतो.पंचांगस्थ गणपती जो सिंधुरवदन आहे तो उत्कर्षदायी व विघ्नहर्ता ठरतो.गुढी पाडव्याला पुरणपोळीचा वा श्रीखंड पुरीचा  नैवैद्य दाखविला जातो.नंतर हा प्रसाद म्हणुन सेवन करावा.हा साडेतीन मुहुर्तां पैकी  एक पुर्ण महुर्त मानल्या जातो.सुर्यास्ता नंतर पुजन करून गुढी काढुन घ्यावी.

असे हे नवीन संवत्सर आपल्या जीवनात सौख्य,समृद्धी,ऐश्वर्य,आरोग्य आणि मन:शांती घेऊन येवो, चैतन्यदायी आनंदाचा शिडकावा अविरत बरसत राहो.

!! शुभम भवतु  !!